मुंबई : "पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात दिलासा मिळाल्याने आनंद वाटला. दोन वर्षात कृतघ्न माणसं पाहिली पण कृतज्ञ माणसांची संख्या जास्त आहे," अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. ते फोनवरुन एबीपी माझाशी बोलत होते.

महसूल मंत्री असताना पदाचा गैरवापर करुन नातेवाईकांना फायदा दिल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर होता. परंतु खडसेंवरील आरोप सिद्ध झाले नाहीत, असा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे.

"माझ्यावर हेतूपुरस्सर आरोप झाले. पण चौकशीतून सत्य समोर आलं. ज्यांनी माझ्यावर आरोप केले, ते तोंडघशी पडले. माझ्या जवळच्या माणसांनी किती गद्दारी केली हा आता बोलण्यासारखा विषय नाही. जे मी पाहिलंय, अनुभवलंय ते मनात ठेवून आपलं काम करत राहायचं. असं होत राहतं," असंही खडसे म्हणाले.

एकनाथ खडसेंची संपूर्ण प्रतिक्रिया

आरोप करणारे तोंडघशी पडले
बातमी समजल्यानंतर मला आनंद वाटला. 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नव्हता. पण आता हेतूपुरस्सर माझ्यावर आरोप झाले. पण चौकशीतून सत्य समोर आलं. आरोपात तथ्य नाही. मी निर्दोष आहे. ह्याचा मला आनंद आहे. ज्यांनी माझ्यावर आरोप केले, ते तोंडघशी पडले.

दोन वर्ष अस्वस्थतेची
माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी दोन वर्ष अस्वस्थतेची होती. माझी टिंगल-टवाळी, मानहानी करण्यात आली. परंतु मी असं कोणतंही कृत्य केलं नाही, ह्यावर मला विश्वास होता. महाराष्ट्रातील जनतेचा मला आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात मला मानणारा एक वर्ग आहे. गोरगरीब जनता माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न जरी केले, मी चुकीची गोष्ट केलीच नाही, त्यामुळ मी निर्दोष सुटेन ह्यावर विश्वास होता. दोषी असेन तर मला फाशी द्या, पण निर्दोष असेन तर सत्य जनतेसमोर आलं पाहिजे, हे मी सातत्याने बोलत आलो आहे.

मंत्रिमंडळात परत येणार?
मी मंत्रिपदासाठी 40 वर्ष काम केलं नाही. आणीबाणीच्या कालखंडापासून मी भाजपसाठी काम करत आहे. आजही मी सरकारमध्ये असेन का नसेन, पण जो विचार घेऊन मी चाललोय ते काम करत राहीन.

भोसरी जमीन खरेदी प्रकरण : एकनाथ खडसेंना दिलासा

पक्षाबाबत कटुता आहे?
कडवेपणा असून नसून उपयोग नाही आणि जे उपभोगलंय ते सांगता येणार नाही. जो निर्दोष माणूस आहे, त्याला मरणापेक्षा यातना अधिक होतात. माझ्यावर आरोप झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत मी ताबडतोब राजीनामा दिला आणि स्वत:च चौकशीची मागणी केली. कोणत्याही विरोधी पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती, आजही केलेली नाही किंवा आरोपांची चौकशी करण्याचीही मागणी केली नव्हती. तथाकथित समाजसेविका किंवा समाजसेवक यांनीच राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन वर्षांच्या कालखंडात मी वाट पाहत राहिलो. फक्त एकनाथ खडसेंवरच आरोप करण्यासाठी काही यंत्रणा ठेवण्यात आली होती. बाकी कोणावर काहीही आक्षेप नव्हते. एकनाथ खडसे आले की आरोप, मंत्रिमंडळाचा विस्तार आला की आरोप. मग काहीतरी नवीन काढायचं आणि आरोप करायचे. महाराष्ट्रातील जनतेला हे समजलं आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

राजीनामा द्यायला नको होता असं वाटतं का?
रामायणातही सीतेवर अविश्वास व्यक्त केल्यानंतर तिला अग्नीदिव्यातून जावं लागलं होतं. नाथाभाऊंचं 40 वर्षांचं राजकीय जीवन होतं. माझ्याकडे काय, माझं चारित्र्यच आहे, माझ्याकडे हजारो रुपयांची प्रॉपर्टी नाही. शेकडो कोटींची मालमत्ता नाही. वडिलोपार्जित इस्टेटच्या पलिकडे माझ्याकडे काही नाही. माझ्याकडे आज एकही इंजिनीअर कॉलेज, फार्मसी कॉलेज, मेडिकल कॉलेज नाही. कोणतीही संस्था नाही. इतकी वर्ष राजकारणात राहिल्यानंतर मी कमावलं असतं. परंतु मला विश्वास आहे की, मी प्रामाणिकपणे, सचोटीने, नियम-कायद्याने कमावलेलं आहे. इन्कम टॅक्सने तीन वेळा माझी चौकशी केली. तीन वेळा छाननी झाली. ते अजूनही केलं तरी मला त्याबद्दल तक्रार नाही, कारण सत्य समोर आलं पाहिजे.

कृतज्ञ माणसांची संख्या जास्त
दोन वर्षात बरेचसे अनुभव आले. अनेकांना मी मोठं केलं, अनेकांना पदापर्यंत पोहोचवलं. सामान्य कार्यकर्त्यांना वर आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जीवाचं रान केलं. पण थोडेफार कार्यकर्ते दूर गेल्याचं लक्षात आलं. कटू अनुभव आहेत आणि कृतघ्न माणसं मी पाहिली आहेत. पण कृतज्ञ माणसांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील जनतेने माझ्याशी कृतज्ञता दाखवली, सातत्याने त्याचा आधार राहिला. ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, अशा अनेकांचं माझ्यावर प्रेम आहे. माझ्या जवळच्या माणसांनी किती गद्दारी केली हा आता बोलण्यासारखा विषय नाही. जे मी पाहिलंय, अनुभवलंय ते मनात ठेवून आपलं काम करत राहायचं. असं होत राहतं.

मुलाच्या स्मृतीदिनी दिलासा मिळाल्याने समाधान
माझ्या जीवनात मी अनेक चढउतार पाहिले, पण पक्षाचा विचार सोडला नाही. एकुलता एक मुलगा आजच्या दिवशी गेला, ह्याचं दु:ख मला होतं, तरीही पंधराव्या दिवशी मी पक्षाच्या कामाला लागलो. माझ्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, पण त्यातून सावरुन लगेचच पक्षाच्या विस्ताराला लागलो, कधी कंटाळा केला नाही. जीवाची पर्वा केली नाही, कुटुंबाची चिंता केली नाही. एकुलता एक मुलगा गेला, त्याचं दु:ख आयुष्यभर राहणार आहे. पण त्यातल्या त्यात आजच्या दिवशी दिलासा मिळाल्याने समाधान आहे. आमच्या कुटुंबाला याबाबत अनेक यातना सहन कराव्या लागल्या. गरज नसताना, तथ्य नसताना एखाद्या कुटुंबाची बदनामी करणं ह्यापेक्षा मोठं दु:ख असू शकत नाही.

संबंधित बातम्या

खडसेंच्या चौकशीसाठी नेमलेल्या झोटिंग समितीवर 45 लाख रुपये खर्च!

भोसरी एमआयडीसी प्रकरणावरून एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर

एकनाथ खडसे मंत्रिमंडळात परतणार?

भोसरी जमीन खरेदी प्रकरण, खडसेंची झोटिंग समितीसमोर हजेरी

मंत्री असताना भोसरी जमिनीचा व्यवहार चुकीचा, खडसेंवर हायकोर्टाचे ताशेरे