भिवंडी : भिवंडी-वाडा रस्त्यावरील खड्ड्याने 30 वर्षीय युवकाचा बळी घेतला. खड्ड्यामुळे बाईकवरुन पडून जखमी झालेल्या गणेश शांताराम पाटील या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेशच्या मृत्यूमुळे अवघ्या 23 दिवसांच्या बाळाच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं.


भिवंडी-वाडा हा रस्ता बीओटी तत्त्वावर सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला होता. त्यामुळे या कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गणेशचा मृतदेह घेऊन ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

भिवंडी-वाडा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक जणांचे जीव गेले आहेत, तर कित्येक जण जखमी होतात. गणेश पाटील दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास भिवंडीहून आपल्या घरी परतत होता. त्यावेळी भिवंडी-वाडा मार्गावरील पालखने गावाजवळ असलेल्या खड्ड्यांमुळे गणेशची दुचाकी उडाली आणि तो काही अंतरावर फरफटत जाऊन डिव्हायडरला आदळला.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या गणेशवर ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र काल सकाळी उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. विशेष म्हणजे गणेशच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि अवघ्या 23 दिवसांची मुलगी आहे.

गणेशच्या मृत्यूची बातमी गावात पसरताच ग्रामस्थ संतप्त झाले. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांजवळ गणेशचा मृतदेह घेऊन गावकऱ्यांनी सुप्रीम कंपनी आणि शासनाविरोधात रास्तारोको केला, आणि जोपर्यंत सुप्रीम कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, जागेवरुन न हलण्याचा इशारा दिला.

गणेशपुरी पोलिसांनी मध्यस्थी करत लेखी आश्वासन दिल्यानंतर तब्बल दोन तासांनंतर ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. सुप्रीम कंपनी जोपर्यंत रस्ते दुरुस्त करत नाही, तोपर्यंत टोल बंद ठेवावा, असं ग्रामस्थांनी सांगितलं आहे. तसं न केल्यास पुढील आंदोलन याहून तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला.