भिवंडी : लॉकडाऊन काळात भिवंडीत झालेल्या चोरीचा अखेर उलगडा झाला आहे. या चोरीमध्ये तक्रारदार महिलेच्या मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. 22 जुलै रोजी सुवर्णा सोनगीरकर यांच्या घरी चोरी झाली होती, ज्यात 13 लाख 21 हजार रुपये किंमतीच्या सोने, चांदी आणि रोख रकमेचा समावेश होता. ही मुलगी डॉक्टरकीचं शिक्षण घेत आहे. प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करण्यासाठी तिने त्याच्याच मदतीने घरातील 13 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला.


लॉकडाऊनदरम्यान बहुसंख्य कुटुंबीय घरात असताना नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील कामतघर येथील एका इमारतीत दिवसाढवळ्या घरफोडीचे घटना घडल्याने पोलीस चक्रावून गेले होते. घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीने लॅचलॉक उघडून ही चोरी केली होती. कपाटासह किचनमधील पत्र्याच्या पेटीत पिशवीत बांधून ठेवलेले 13 लाख 21 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला. त्यामुळे या चोरीत घरातील अथवा माहितीतील जवळच्या व्यक्तीचा समावेश असणार, असा अंदाज पोलिसांनी बांधला होता. पोलिसांनी तपास केला असता या चोरीमध्ये तक्रारदार महिलेची मुलगी आणि तिच्या प्रियकराचा समावेश असल्याचं उघड झालं.


तक्रारदार महिलेची 21 वर्षीय मुलगी स्नेहल सोनगीरकर ही बीएचएमएसचं शिक्षण घेत आहे. तिचे धुळ्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करण्याचा तिचा प्लॅन होता. परंतु भविष्यात आर्थिक चणचण भासू नये यासाठी तिनेच आपल्या प्रियकराला बोलावून, त्याला घरातील सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल देऊन पाठवलं. त्यानंतर त्यानंतर घरात चोरी झाल्याचा बनाव केला.



पोलिसांनी महिलेच्या मुलीची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांचं पथक धुळ्यात गेलं आणि तिथे मुलीचा प्रियकर प्रतीक तुषार लाळे (वय 21 वर्षे) आणि त्याचा मित्र हेमंत दिलीप सौंदाणे (वय 21 वर्षे) यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 55 हजार रुपये रोख रक्कम आणि 8 लाख 96 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले. यापूर्वीही त्यांनी अशाचप्रकारे चोरी केल्याची कबुली दिली.


पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल व्हरकाटे यांच्या पथकाने या चोरीचा उलगडा केला.