Bhiwandi Froud News : पंतप्रधान मोदींचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-बडोदा महामार्गात भिवंडी तालुक्यातील नंदिठणे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबदला राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये अदा करण्यात आली  आहे. यापैकीच आठ शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनीचे नायब तहसीलदार आणि त्याच्या मैत्रिणीने डाव रचून  बनावट कागदपत्रे तयार केली होती. या आरोपी जोडीसह वकील आणि भाजपच्या लोकप्रतिनिधीचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने जमीन घोटाळ्यामध्ये भाजपचे कनेक्शन समोर आले आहे.  


या सर्व आरोपींनी मिळून शासनाकडून मूळ शेतकऱ्यांना मिळालेली 11 कोटी 66 लाख 64 हजार रूपयांची रक्कम परस्पर काढून घेऊन शेतकऱ्यांबरोबर, शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत नायब तहसीलदाराच्या मैत्रिणीसह 17 आरोपींना अटक केली असून घोटाळ्यातील नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी फरार झाला आहे. 


सखोल चौकशी आणि कारवाईची मागणी


मुंबई- बडोदा महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असताना देखील भाजपच्या लोकांनी संगनमत करून शासनाची 11 कोटी 66 लाखांची फसवणूक केली आहे. हा दोष कर्मचाऱ्यांचा नसून प्रांत अधिकाऱ्यांचा आहे. कारण त्यांच्या शिवाय हे पैसे वर्ग होऊ शकत नाही. त्यामुळे या आधीचे प्रांताधिकारी मोहन नळदकर व सध्याचे प्रांताधिकारी वाघचौरे यांनी निकाली लावलेल्या प्रत्येक प्रकाराची सखोल चौकशी आणि कारवाईची मागणी भिवंडी ग्रामीणचे शिवसेना आमदार शांताराम मोरे यांनी केला आहे
 
अन् जमीन घोटाळ्याचा झाला पर्दाफाश  


सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील  नंदिठणे गावातील मूळ जमीन मालक नारायण रामजी भोईर यांची एकूण आठ सर्व्हे क्रमांकामध्ये एकूण 17 हजार 824 चौरस मीटर जमीन आहे. ही जमीन मुंबई-बडोदा महामार्गासाठी लागणार असल्याने शासनाने अधिग्रहित केली आहे. मात्र नारायण भोईर यांचे निधन झाल्याने त्यांच्या नऊ वारसांच्या नावे अधिग्रहित जमिनीचा मोबदला शासनाकडून मिळणार होता. दरम्यानच्या काळात आरोपींनी या जमिनीचे कुलमुखत्याधारक आपण आहोत असं सांगत सर्व शासकीय नोंदणीची कागदपत्रे नरेंद्र नारायण भोईर यांनी आपल्या भावंडांच्या दस्तऐवजासह महसूल कायार्लयात जमा केली. त्या कागदपत्रांच्या आधारे उपविभागीय कार्यालयाने जमीन अधिग्रहणाची 11 कोटी 66 लाखाची रक्कम मृतक नरेंद्र भोईर यांच्या बँक खात्यात गेल्या वर्षी जमा केली. मात्र रक्कम संबंधित वारसांना मिळाली नसल्याने ठाणे पाचपाखाडी येथे राहणारे मृतक शेतकऱ्याचे वारस विनीत भोईर, अमोल भोईर आणि हरेश भोईर हे वारस गेल्या महिन्यात भिवंडी उपविभागीय कार्यालयात आले. त्यांनी नंदिठणे येथील नारायण भोईर यांचे वारस आपण आहोत. जमीन अधिग्रहणाचा मोबदला आम्हाला द्यावा म्हणून अर्ज दिला. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता मूळ मालक हे तीन भाऊ असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.


बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन घोटाळा


भिवंडी तालुक्यातील नंदिठणे येथील आठ मूळ जमीन मालकांच्या नावाचे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून त्या आधारे भिवंडीतील दस्त नोंदणी कार्यालयात बनावट दस्त, खोट्या स्वाक्षऱ्या मारून नारायण भोईर यांच्या जमिनीचा मोबादला अज्ञात व्यक्तिंनी काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी भिवंडी उपविभागीय  कार्यालयातील अव्वल कारकून संजय गाढवे यांच्या तक्रारीवरून अज्ञात  व्यक्तिंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असता त्यामध्ये नायब तहसीलदार गोसावी आणि त्याची  मैत्रीण मनिषा पगारे (जाधव) या दोघांनी मिळून भाजपचे भिवंडी पंचायत समितीचे सदस्य व माजी सभापती असलेले गुरुनाथ जाधव तसेच वकील प्रवीण चौधरी यांच्यासोबत संगनमत करून बनावट वारस शेतकरी बनवून सदरच्या जमिनीचे कागदपत्र तयार करून 11 कोटींवर राज्य सरकारला चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. 


टक्केवारीच्या गोरखधंद्यामुळे बंटी बबली मालामाल


मुख्य आरोपी गोसावी हा भिवंडी उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार पदावर अनेक वर्षापासून कार्यरत आहे. तो त्याची मैत्रीण आरोपी मनीषा पगारे (जमिनीची दलाल)  हिला शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बाबत माहिती देऊन बाहरेच्या बाहेर टक्केवारीनुसार कामे करून संबधित शेतकऱ्यांकडून टक्केवारीची ठरलेली रक्कम घ्यायचा. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची कागदपत्रे नियमानुसार असल्याचं अशा शेतकऱ्यांकडून मिळालेल्या जमिनीच्या मोबदल्यातून 4 टक्के तर वाद विवाद असलेल्या जमिनीच्या मोबदल्यातून 50 टक्के रक्कम घेण्याचा गोरखधंदाच जोडीने केल्याचे तपासात उघडकीस आले असून या टक्केवारीतून काही टक्के रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदरात पडत असे. 


विशेष म्हणजे 11 कोटी 66 लाखांची रक्कम हातात पडताच साडे चार ते पावणे पाच कोटी मनीषाच्या हातात रक्कम पडली, त्यामधून साडे तीन कोटी नायब तहसीलदार गोसावीला दिली. तर वकीलाला 31 लाख दिले. तसेच मनिषाने एक कोटी स्वतःजवळ ठेवून उर्वरित रक्कम भाजपचे पंचायत समिती सदस्यांसह बोगस शेतकऱ्यांना दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत मुख्य आरोपी नायब तहसीलदार गोसावी अटक होत नाही. तोपर्यंत त्याच्याकडे असलेल्या साडे तीन कोटी रुपये रकमेत आणखी कोण हिस्सेदार आहेत. त्यानंतर समोर येईल. विशेष म्हणजे ठरलेल्या टक्केवारीत तत्कालीन व विद्यमान उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची शक्यता असल्याने भिवंडी उपविभागीय कार्यालय वादाच्या भोऱ्यात अडकले आहे.  


शेतकऱ्याच्या नावे बँकेत बोगस खाते


जमिनी घोटाळा भिवंडी तालुक्यात करून जमिनीचा मिळणाऱ्या मोबदल्यासाठी थेट मुरबाड तालुक्यातील आयसीआयसी बँकेच्या शाखेत मृत शेतकऱ्याचे नावे खाते उघडण्यात आले. त्यानंतर जमिनीचा मिळणारा मोबदला 11 कोटी 66 लाख रुपये या खात्यात वळवण्यात आले आणि त्याची हिस्सेवारी करण्यात आली. या घोटाळ्याची बिंग फुटल्याने आता पोलिसांनी बँकेमध्ये हे खाते बोगस कागदी पुरावे ने कसे उघडण्यात आले याची देखील चौकशी सुरू करण्यात आली आहे