भिवंडी : महापालिकेत दहा वर्ष नगरसेवकपद भूषवणारे माजी अपक्ष नगरसेवक सुहास नकाते यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर धरला आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह नकाते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार कपिल पाटील, शहराध्यक्ष संतोष शेट्टी, नगरसेवक सुमित पाटील उपस्थित होते.
ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नकाते यांनी भाजपप्रवेश केल्याने भाजपची ताकद वाढल्याचं मानलं जात आहे.
दुसरीकडे, शांतीनगर, पिराणीपाडा येथे भाजप अल्पसंख्याक महिला विभागाच्या अध्यक्षा हसीना बिलाल अन्सारी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात असंख्य मुस्लिम युवा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष वसीम अन्सारी उर्फ पप्पू भाई आणि त्यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपने मुसंडी मारली आहे. यामुळेच भाजपमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणावर सुरु झालं आहे.