भिवंडीत 35 वर्षीय बॉडीबिल्डरचा हार्ट अटॅकने मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 06 Mar 2019 07:48 AM (IST)
उरणमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेत रवी सावंत यांनी तिसऱ्या गटात सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यामुळे त्यांची निवड 'भारत श्री' स्पर्धेसाठी झाली होती.
भिवंडी : भिवंडी शहरातील नामांकित शरीरसौष्ठवपटूचा अकस्मात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 35 वर्षीय रवी सावंत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात असंख्य स्पर्धा जिंकून रवी सावंत यांनी नाव कमावलं होतं. नुकतंच उरणमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्यांनी तिसऱ्या गटात सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यामुळे सावंत यांची निवड 'भारत श्री' स्पर्धेसाठी झाली होती. रवी सावंत यांनी पाच दिवसांपूर्वीच 'भिवंडी श्री'चा किताब पटकावला होता. रवी सावंत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूने शरीरसौष्ठव क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. काल संध्याकाळी त्यांच्यावर साश्रू नयनाने अंत्यसंस्कार करण्यात आले.