रायगड : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं तापमानाचा उच्चांक गाठणाऱ्या रायगड जिल्ह्यातील भिराचं तापमान हे भौगोलिक कारणांमुळेच वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. कुलाबा वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी तसं निरीक्षण नोंदवलं आहे.
रायगड जिल्ह्यातील भिरा गावाचं तापमान 28 मार्च रोजी 46.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं. भिरामधील हे तापमान राज्यातील त्या दिवसाचं सर्वाधिक तापमान होतं. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा भिराकडे वळल्या. अनेकांनी भिरामधील तापमानाची नोंद ही तापमापीमध्ये बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे मुंबईतल्या कुलाबा वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी भिराचा दोन दिवसांचा दौरा केला.
अधिकाऱ्यांना या दौऱ्यावेळी तापमापी उपकरण आणि पद्धती योग्य असून, या परिसरात झालेली तापमान वाढ भौगोलिक कारणांमुळेच असल्याचं आढळून आलं. या दौऱ्यानंतर कुलाबा वेधशाळेचे अधिकारी हेमंत कारेकर यांनी, ''हिट - वेव्ह' आणि भौगोलिक परिणामामुळेच भिरा येथील तापमान वाढल्याचं,'' स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांतील तापमानवाढीमुळे प्रशासनाच्या वतीने भिरा आणि परिसरातील ग्रामस्थांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी उन्हापासून बचाव करण्याच्या सूचना देणारे फलक सर्वत्र लावण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या
महाराष्ट्रात उष्णतेची लाट, उष्माघाताचे पाच बळी
निम्म्या महाराष्ट्राचं तापमान चाळिशीपार, राज्यभर उन्हाचा चटका
उष्माघाताचा दुसरा बळी, धुळ्यात माजी सरपंच महिलेचा मृत्यू
रायगडचा पारा 46.5 अंशांवर, जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान
PHOTO: उष्माघातापासून बचावासाठी काय करावं, काय टाळावं?