वसई : भाईंदरमध्ये झालेल्या मायलेकीच्या हत्या प्रकरणाचा अखेर छडा लागला आहे. महिलेच्या प्रियकरानेच मायलेकीची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. विनायक एपूर असं आरोपीचं नाव आहे. मयत दीपिका पैशासाठी ब्लॅकमेल करत असल्याने आपण तिला ठार मारल्याचं विनायकने पोलिसांना सांगितलं आहे.
28 जानेवारीला 29 वर्षीय दीपिका संघवी आणि 8 वर्षांची हेतल या मायलेकींचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.
दीपिकाचे तिच्या नवऱ्यासोबत पटत नव्हते. त्यामुळे ती वेगळी रहात होती. दीपिका आणि आरोपी विनायक हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीचे संबंध जुळले.
आरोपी विनायकचे नेहमी दीपिकाच्या घरी येणे-जाणे होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध देखील असल्याचं म्हटलं जातं. दीपिकाची नोकरी गेल्यामुळे ती आरोपी विनायककडे पैसे मागत होती. याच पैशांवरुन दोघांमध्ये 25 जानेवारीला वाद झाला.
हेतलचा आपल्या शाळेत 26 जानेवारीला डान्स होता. त्या डान्सची प्रॅक्टीस मायलेकी घरी करत होत्या. तर आरोपी विनायक हा माबाईलवर शुटींग करत होता. त्यानंतर दीपिका झोपली असताना विनायकने तिच्यावर वार करुन तिची हत्या केली. हत्या करताना हेतल जागी झाली आणि आपल्या आईची हत्या करत असल्याचं बघितलं. त्यामुळे 8 वर्षाच्या हेतललाही गळा दाबून विनायकने ठार मारलं आणि घटनास्थळावरुन फरार झाला.
पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये विनायक सोसायटीच्या पायऱ्या उतरताना दिसला होता. त्याच आधारावर विनायकचा शोध पोलिस घेत होते. विनायक शिर्डीला गेला होता. अखेर पोलिसांनी त्याला दहिसरमधून अटक केली आहे.