उद्योग खात्यात ढवळाढवळ करणारा तो भूषण देसाई कोण? राष्ट्रवादीचा सवाल
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2016 05:57 PM (IST)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला खिंडीत पकडण्यास सुरुवात केली असून राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाईंवर जोरदार हल्ला चढवला. आमदार सुभाष देसाईंना लक्ष करून उद्योग खात्यात हस्तक्षेप करणारा भूषण देसाई कोण? असा सवाल त्यांनी आज विधान भवनात विचारला. भास्कर जाधव यांनी सुभाष देसाईंवर हल्ला करतानाच, हा भूषण देसाई मनमानी पद्धतीने उद्योग खात्यात जमीन वाटप करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहे. तसेच, रत्नागिरी MIDC तील त्याचा हस्तक्षेप वाढलेला असल्याचेही विधान भवनाच्या निदर्शनास आणून दिले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मुलाचे नाव भूषण देसाई असल्याचे समजते. त्यामुळे हाच तो उद्योग खात्यात हस्तक्षेप करणारा भूषण देसाई आहे का ? याचा खुलासा उद्योगमंत्री यांनी करावा. अशी मागणी देखील आ. जाधव यांनी यावेळी केली.