Rain Update : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर अशाप्रकारे जवळपास संपूर्ण एमएमआरडीए (MMRDA) परिसरात गेल्या काही तासांपासून तुफान पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर अतिमुसळधार पाऊस सुरु असून हा पाऊस वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळेच मुंबईसह परिसरातील यलो अलर्ट आता बदलून ऑरेंज अलर्ट झाला आहे. म्हणजेच याठिकाणी देण्यात आलेला धोक्याचा ईशारा आता आणखी वाढला आहे. तसंच या सर्व ठिकाणी पुढील काही दिवस आणखी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे.
पुढील काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असल्यानं तसेच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं मुंबईसह परिसर आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईततर सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढू शकतो, असंही समोर आलं आहे. पुढील दिवसानंतर हाच मुंबईतील पावासाचा जोर आणखी वाढेल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे. तर डोबिंवली परिसरात मागील 3 तासात 85 मिमी पावसाची आणि नवी मुंबईतील कोपरखैरणा येथे 3 तासात 87.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसंच भिवंडी शहरात देखील रविवारपासून उघडीप दिलेल्या पावसाने दुपारी तीन वाजल्यापासून दमदार पुनरागमन केलं आहे. या दोन तास सुरू राहिलेल्या पावसात भिवंडी शहरातील अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले असून भिवंडी ग्रामीण भागात देखील पावसाचे पाणी सखलभागात साचत आहे.
कोकणातही तुफान पाऊस सुरुच असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याठिकाणी ऑरेंज अलर्ट कायम आहे. तसंच पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई-गोवा हायवेवर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यात मंगळवारपासून मुंबईसह राज्यभरातील बऱ्याच भागात पाऊस पुन्हा जोमात सक्रिय होणार अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने नुकतीच दिली आहे.
राज्यातील विविध ठिकाणची पावसाची आकडेवारी (सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत)
महाबळेश्वर - 94.6 मिमी
मुंबई (कुलाबा) - 27 मिमी
मुंबई (सांताक्रुज) - 19.2 मिमी
कोल्हापूर - 21.8 मिमी
रत्नागिरी - 51.3 मिमी
अलिबाग - 24.3 मिमी
ठाणे - 59 मिमी
माथेरान - 70 मिमी
डोंबिवली - 104 मिमी
हे ही वाचा :
- Maharashtra Rains : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, 4 जुलैपासून कोकणासह विदर्भात मुसळधार
- Parashuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताय? परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद; दरड खाली आल्याची माहिती
- Rain Updates : मुसळधार! मुंबई परिसरासह, कोकणातही धो-धो पाऊस, पुढील 3 ते 4 तास आणखी कोसळणार, हवामान विभागाचा इशारा