CM Eknath Shinde : विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान अपमानास्पद वागणूक मिळाली. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला अन्यायाविरोधात उभं राहण्यास सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर बाहेर पडलो. लढून शहीद झालो तरी चालेल पण माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न करणार हे त्याच दिवशी ठरवलं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. विधानसभेत विश्वासमत दर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यंत्री शिंदे यांनी वक्तव्य केले. 


शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजप यांनी सरकार स्थापन केले आहे. अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, शिवसेना आणि भाजपचे सरकार पुन्हा आले आहे. माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना व इतर अपक्षांचे 50 आमदार सोबत होते. माझ्यावर विश्वास ठेवून साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. विरोधी पक्षातून सत्तेकडे जातात, असं दिसून येतात. मात्र, आम्ही सत्तेतून विरोधात गेलो. महाराष्ट्रातील सत्तांतर ही ऐतिहासिक घटना आहे. या घटनेची देशाने नव्हे 33 देशांनी दखल घेतली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 


शिंदे यांनी म्हटले की, एका बाजूला सत्ता, सरकारी यंत्रणा होती. तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा सामान्य सैनिक होता. माझ्यासोबत आलेल्यांपैकी एकाही आमदाराने विचारलं नाही की किती दिवस लागतील. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, असेही त्यांनी म्हटले. आम्ही स्वार्थासाठी नव्हे विचारांसाठी एकत्र आलो आहोत, असेही त्यांनी सांगितले. 


आम्ही कालही शिवसैनिक आणि आजही शिवसैनिक आहोत


राज्यात अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये होतो. आम्हाला फार चांगले अनुभव आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानास्पद कोणी लिखाण केले,  बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार कोणी काढला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्हाला गद्दार म्हटले गेले पण आम्ही कालही शिवसैनिक होतो आणि उद्याही शिवसैनिक राहणार असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. मी शिवसेनेला वेळ दिला, शिवसैनिकांना मानतो. मी शिवसेनेला कुटुंब मानत असल्याचे त्यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: