मुंबई : नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी न्यू इअर पार्टी अरेंज करणाऱ्या देशभरातील 98 हॉटेल, पब्स आणि रेस्टॉरंट मालकांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिलाय. गाण्याच्या कॉपीराईट्स शिवाय चित्रपटातील तसेच प्रसिद्ध अल्बममधील गाणी यंदा नववर्षाच्या पार्टीत हॉटेल, पब्स आणि रेस्टॉरंट मालकांना वाजवता येणार नाहीत असे आदेश सुट्टीकालीन न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्यासह देशभरातील पंचतारांकित हॉटेल आणि पब्स मालकांचे धाबे दणाणले आहेत.

संगीत परवाना देणाऱ्या फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड (पीपीएल)मंडळाकडे 20 लाखाहून अधिक गाण्यांचे मालकी हक्क आहेत. दरवर्षी नाताळ, न्यू इअर पार्टीला देशभरातील हॉटेल, पब्स आणि रेस्टॉरंटमध्ये गाण्यांचे कोणतेही परवाना शुल्क न भरताच ही गाणी वाजवली जातात.

कॉपीराईटस कायद्याअंतर्गत हॉटेल पब्स आणि रेस्टॉरंटसारख्या आस्थापनांना मंडळांकडून ही परवानगी घेणे बंधनकारक असून तशी परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेडच्यावतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुट्टीकालीन न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.

हॉटेल मालकांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमीटेड कॉपीराईटस ठेवणारी मुख्य कंपनी नसून इतर कंपन्यांकडून हे हक्क विकत घेण्यात आले आहेत. पीपीएलने केवळ त्या कंपन्यांना या प्रकरणात प्रतिवादी केले आहे. मात्र न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन प्रथमदर्शनी असे दिसून येते की पीपीएल ही गाण्यांचे कॉपीराईटस असेलेली कंपनी आहे. त्यामुळे पीपीएलचे परवाना शुल्क भरुन हॉटेल, पब्स आणि रेस्टॉरंट मालकांनी गाणी वाजवावी असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं. हायकोर्टाच्या आदेशानंतर धास्तावलेल्या काही हॉटेल तसेच रेस्टॉरंट मालकांनी हे परवाना शुल्क भरण्याचे मान्य केले आहे.