BEST Recrupment News Updates: बेस्ट (BEST) उपक्रमातील 725 पैकी 123 कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी करण्यात येईल, असं आश्वासन काल (26 ऑक्टोबर 2023, गुरुवार) महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आलं आहे. येत्या दोन दिवसांत ऑर्डर काढून 123 कामगारांना सेवेत समाविष्ठ केलं जाईल आणि उर्वरित कामगारांना इतर ठिकाणी समाविष्ट करण्यात येईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याकडून देण्यात आली आहे. 


कंत्राटी कामगारांचा कायमस्वरूपी बेस्ट उपक्रम सेवेत समावेश करावा, या मागणीसाठी गेल्या आठवड्यात बेस्ट कामगारांनी आझाद मैदानात उपोषण पुकारलं होतं. या कामगारांनी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली होती. त्यावेळी दानवे यांनी त्या कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत समाविष्ट करण्यासाठी बैठक लावून तोडगा काढणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज महापालिका मुख्यालयात दानवे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्यासह बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांच्यासोबत बैठक पार पडली.


आधी 123 त्यानंतर उर्वरित कामगारांना सेवेत कायमस्वरूपी करणार 


या बैठकीत बेस्ट उपक्रमातील 725 पैकी 123 कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी करण्यासाठी येत्या एक दोन दिवसांत ऑर्डर काढून त्यांना सेवेत समाविष्ट करण्यात येईल, तर उर्वरित कामगारांना इतर ठिकाणी समाविष्ट करण्यात येईल, अशी ग्वाही  महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आली.


दरम्यान, बैठकीसाठी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, सुहास सामंत ( अध्यक्ष बेस्ट कामगार सेना), अनिल पाटणकर (माजी अध्यक्ष बेस्ट), रंजन चौधरी (सरचिटणीस बेस्ट कामगार सेना), उपाध्यक्ष उमेश सारंग  मनोहर जुन्नर, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.