मुंबई : वेतन करारासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीचं बेमुदत उपोषणाला यश मिळालं आहे. बुधवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतन करारासंदर्भातली महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांनाही आता सातवा वेतन आयोग लागू करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.


बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या वेतनकरारासह विविध मागण्यांसाठी आग्रही असलेल्या बेस्ट संयुक्त कृती समितीने संपाचा इशारा दिला होता. संप पुकारण्याबाबत मतदान घेण्यात आलं होतं. त्यात बेस्टच्या 98 टक्के कामगारांनी संपाला समर्थन दिलं होतं. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह बेस्ट समिती अध्यक्ष, बेस्ट कामगार सेनेचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. तसेचं बेस्ट कर्मचाऱ्यांची ही मागणी आज तत्वत: मान्य करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत निर्णय होईल, असंही आश्वासन आमदार अनिल परब यांनी दिलं आहे.

बेस्ट कामगार वेतन कराराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर चर्चा झाली. बेस्टसंयुक्त कामगार समितीचे नेते कालपासून बेमुदत उपोषण आंदोलन करत असून तोडगा न काढल्यास कामगारांनी संपाचा इशारा दिला होता. याबाबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की कोण माघार घेतो, कोण ठाम आहे त्याच्याशी आमचं देणेघेणे नाही. आमची भूमीका बेस्टच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे, त्यांना सातवा आयोगच्या धरतीवर वेतन मिळाला पाहिजे याबाबतची आहे.

आम्ही निर्णय घेतला असून ऑक्टोबरमध्ये नव्या पद्धतीने पगार मिळेल. सानुग्रह अनुदान हे पालिकेच्या धरती वर मिळेल. त्यासाठीचा पैसा पालिका देईल असा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.