मुंबई : मुंबईतील प्रमुख आकर्षणापैकी एक असणारी डबर डेकर बस रस्त्यावर गायब होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील 120 डबल डेकर बसेस पैकी 72 बसेस 2020 स्क्रॅप होणार आहेत. मुंबईतील निम्म्यापेक्षा जास्त डबलडेकर बसचं आयुर्मान संपलं आहे. असं असलं तरी मुंबईतील डबलडेकर बस पूर्णत: बंद होणार नाहीत, असं बेस्टचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी आश्वासन दिलं आहे.


मुंबईत असणाऱ्या 120 डबल डेकर बसेसपैकी 72 बसेसचं आयुर्मान संपत आल्याने त्या स्क्रॅप करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्यानंतर उर्वरित डबल डेकर बसही कमी केल्या जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सेवेत असणारी डबल डेकर बस हळूहळू नामशेष होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


डबल डेकर बसही मुंबईची ओळख आहे. डबल डेकर बसमधून प्रवास करणे सगळ्यांच्याच आवडीचा भाग राहिला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या डबल डेकर बस मुंबईच्या रस्त्यावर धावत आहेत. मात्र देखभाल करण्याचा खर्च परवडत नसल्याने आता या डबल डेकर बस बेस्टमार्फत हळूहळू कमी केल्या जात आहेत.


मात्र बसेसची संख्या कमी करण्यात येत असली तरी त्या पूर्णत: बंद होणार नाहीत, असं बेस्ट अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सांगितलं. नवीन मेट्रो मार्ग, उड्डाण पुलामुळे काही डबल डेकर बस कमी केल्या जात आहेत. मात्र त्या पूर्णतः बंद केल्या जाणार नाहीत, असं अनिल पाटणकर यांनी सांगितलं.


VIDEO |  राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट