मुंबई : येत्या मंगळवारी मुंबईकरांचा मनस्ताप वाढण्याची शक्यता आहे. बेस्ट बसचालकांनी मंगळवार म्हणजेच 30 ऑगस्टला बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

 
मुंबई पालिका क्षेत्रात खासगी बसेसना परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला विरोध म्हणून मंगळवारी बेस्टच्या गाड्या रस्त्यावर उतरणार नाहीत. बेस्टच्या बसेस मुंबईकरांच्या आयुष्यात लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेइतकीच महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

 
शहरात कोणताही अनुचित प्रकार घडतो तेव्हा बेस्टच्या ज्यादा बसेस सोडण्याचे आदेश राज्य सरकार हक्काने देते. मात्र तरीही बेस्टला संपवण्याचा घाट घातला जात असेल तर मंगळवारी बेस्टही बंद ठेवू असा इशारा कामगार सेनेने दिला आहे.