मुंबई: येत्या सोमवारी म्हणजे 31 मार्चला रमजान ईद (Eid) साजरी करण्यात येणार आहे. तर मंगळवारी बासी ईद साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवाकडून तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, या दिवशी मुंबईतील विविध भागांत मोठ्या प्रमाणात रहदारी असते. यामुळं नागरिकांच्या सोयीसाठी बेस्ट (BEST) उपक्रमातर्फे 128 ज्यादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, बेस्ट प्रशासनाचं आवाहन
बासी ईदच्या दिवशी मोहम्मद अली रोड, हाजी अली, शिवाजी नगर, अंधेरी, जुहू चौपाटी, मालवणी, जोगेश्वरी, माहीम, धारावी, ॲन्टॉप हिल या भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होते. नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा उत्तम पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही बेस्टकडून अतिरिक्त बससेवा पुरवण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनाने प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. ज्यादा बसगाड्यांमुळे प्रवाशांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल, असा विश्वास बेस्टने व्यक्त केला आहे.
भिवंडीत रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी
रमजान ईद आणि गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून, खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. भिवंडीतील तीन बत्ती, जुना बाजार, शेठ नाका आणि इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधव नवीन कपडे, घरगुती वस्तू आणि खाद्यपदार्थ खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले आहेत. महिलांसाठी ड्रेस मटेरियल, साड्या, कॉस्मेटिक्स आणि दागिने यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच लहान मुलांसाठी नवीन कपडे, चप्पल आणि खेळणी घेण्यासाठीही पालकांची लगबग सुरु आहे.
नागरिकांची गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त
‘लाडकी बहिण योजना’ अंतर्गत मिळालेल्या आर्थिक सहाय्याचा लाभ अनेक महिलांनी घेतला आहे. या योजनेंतर्गत मिळालेल्या रकमेतून अनेक महिलांनी उत्साहाने खरेदी करत बाजारात गर्दी वाढवली आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ असल्याने पारंपरिक वेशभूषा, सुवासिक उटणे, गंध, तोरणे आणि पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. त्यामुळे बाजारात सणासुदीचे वातावरण पाहायला मिळत आहे. नागरिकांची गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये पोलिसांची तैनाती वाढवण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गस्त वाढवण्यात आली आहे.
रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या खरेदीमुळे बाजारपेठा फुलल्या
रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या खरेदीमुळे बाजारपेठा फुलल्या असून, व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांपासून मंदीचा सामना करणाऱ्या व्यावसायिकांना या सणांच्या निमित्ताने मोठा दिलासा मिळाला आहे. भिवंडी शहरात एकाच वेळी दोन मोठे सण येत असल्याने संपूर्ण बाजारपेठांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या: