शुक्रवारी रात्री मुंबईतील हार्बर मार्गावर झालेल्या अपघातात सत्तर वर्षीय पिरबीचंद आझाद या व्यक्तीचा मृत्यू झाला. मूळचा राजस्थानचा असलेला पिरबीचंद गोवंडी स्थानकापासून जवळ असलेल्या झोपडीत राहत होता. शुक्रवारी रात्री रेल्वे रुळ ओलांडताना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात देण्याच्या उद्देशाने त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरु केला. अपघात झालेल्या परिसरातच त्याची झोपडी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या झोपडीची झडती घेतली असता त्यांना बँकेच्या ठेवीची कागदपत्रे सापडली. तसेच नाण्यांनी आणि नोटांनी भरलेली पोती देखील सापडली.
या झोपडीमध्ये पोलिसांना सापडलेली चिल्लर दीड लाखापेक्षा अधिक असण्याचा अंदाज आहे. तर आठ लाख सत्त्याहत्तर हजार रुपये त्या व्यक्तीच्या बँक खात्यात जमा असल्याची माहिती मिळत आहे. या लखपती भिकाऱ्याची संपत्ती पाहून पोलीस देखील चक्रावून गेले असून आता या भिकाऱ्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.