मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 22 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर आता अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.


मोठा गाजावाजा करुन पंतप्रधान मोदींनी बुलेट ट्रेनचं काही दिवसांपूर्वीचं उद्घाटन केलं. मात्र, आता या दुर्घटनेनंतर मुंबईकरांनी बुलेट ट्रेन नको पण लोकलसाठी पायाभूत सुविधा द्या. अशी जोरदार मागणी केली जात आहे.

बुलेट ट्रेनआधी मुंबईत रेल्वेच्या पायाभूत सुविधांची गरज :

एल्फिन्स्टन आणि परळ स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या आणि तुफान गर्दी झाली. पुलावरुन खाली उतरताना अचानक पत्रा तुटल्याचा आवाज आला. त्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले आणि चेंगराचेंगरी झाली.

अवघ्या काही मिनिटात झालेल्या दुर्घटनेत 22 जणांचा जीव गेला. रेल्वे पोलीस, रुग्णवाहिकांना वर्दी दिली. पण गर्दी प्रचंड असल्यानं मृतदेह पायऱ्यांवरुन बाहेर काढताना बरीच दमछाक झाली. लोकांनीच एकमेकांना मदत केली आणि 32 जखमींना रुग्णालयात दाखल केलं.

एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवरील पूलआणि जिने अतिशय अरुंद त्यात आपत्कालिन सोयींची वानवा यामुळे आज 22 जणांना आपला जीव गमवावा लागला. एकीकडे पायाभूत सुविधांची कमतरता असताना दुसरीकडे बुलेट ट्रेन सुरु करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे आता सरकारवर जोरदार टीका सुरु आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर पियुष गोयल मुंबईकरांना नव्या 60 गाड्यांचं गिफ्ट देण्यासाठी आले होते. पण  त्यांनी थेट केईएम रुग्णालय गाठलं.

लोकलनं रोज 70 लाख लोकं प्रवास करतात. गेल्या 9 महिन्यात 480 लोकांचा लोकल अपघातात जीव गेला आहे. वर्षाला हा आकडा तीन हजाराच्या आसपास असतो.

तीनही लोकल मार्गांवर धोकादायक असे अनेक स्पॉट्स आहेत. जिथं मृत्यू दबा धरुन बसला आहे. त्यामुळे एकदा विचार करा. महत्वाचं काय आहे? मुंबईकरांचा जीव, इथली लोकल व्यवस्था की बुलेट ट्रेन?

संबंधित बातम्या :
एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं?

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: कोणाला किती मदत?