नवी मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले एका खाजगी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची त्यांना नोकरीत मिळत असलेल्या यशामुळे हत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ यांचा मृतदेह कल्याणच्या हजी मलंग येथे सापडला.

याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. सिद्धार्थ यांची हत्या केल्याचं ताब्यात घेतलेल्या एका आरोपीनेच पोलिसांना सांगितल्याचा दावा करण्यात आलाय.

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी अटक केलेल्या चार जणांपैकी दोन जण सिद्धार्थ यांचे सहकारी, एक कॅब चालक असल्याचं बोललं जात आहे. तर एक कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. सिद्धार्थ यांची कमला मिल कम्पाऊंडच्या पार्किंगमध्ये हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासमवेत राहतात. बुधवारी रात्री ते ऑफिस सुटल्यानंतर लोअर परळवरुन मलबार हिलकडे, घराकडे निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना वॉचमनने त्यांना पाहिलंही होतं. मात्र ते घरापर्यंत काही पोहोचलेच नाहीत.

बराच वेळ ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांना फोन लावून चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन बंद होता. रात्रभर शोधाशोध करुन, वाट पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी एन एम जोशी पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपास चालू केला असता, शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ यांची कार नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात आढळली. या गाडीत रक्ताचे डाग होते. अखेर आज नवी माहिती पोलिसांना मिळाली आहे.