मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक ट्रस्टवरुन पक्षात सुरु असलेली अंतर्गत चुरस अखेर संपुष्टात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ट्रस्टींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मारक पब्लिक ट्रस्टमध्ये खुद्द उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत सुभाष देसाई आणि आर्किटेक्ट शशी प्रभूंचं नाव निश्चित झालं आहे. ट्रस्टींच्या नावांची अंतिम यादी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
मुंबईतील महापौर बंगला आवारात बाळासाहेबांचं स्मारक उभारलं जाणार आहे. या स्माराकासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल सरकारने मंजूर केला आहे. त्यामुळे यासाठी लवकरच पब्लिक ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे.
स्मारकाच्या ट्रस्टींमध्ये 7 ते 11 जणांचा समावेश असणार आहे. यामध्ये उद्धव आणि आदित्य ठाकरेंचं सदस्यत्व कायम असणार आहे. तसंच मुंबई महापालिका आणि राज्यातील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही ट्रस्टींमध्ये समावेश असेल.
दरम्यान ट्रस्टींमध्ये शिवसेनेतर्फे अनेकांमध्ये चुरस होती. दिवाकर रावते, संजय राऊत, लीलाधर डाके यांच्यावर मात करत सुभाष देसाईंनी बाजी मारली आहे. दसरा मेळाव्या आधी समितीची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.