दिवसातून एकदा तरी बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेबांना शिवसेनेत असताना 25 वर्ष जवळून पाहता आलं. शिवसेनेत असताना अनेक आंदोलनं बाळासाहेबांच्या नेतृत्वात केली, या आंदोलनांमध्ये मी प्रत्यक्ष सहभागी झालो होतो. या सर्वांचा मी साक्षीदार आहे. राज्यात लवकरच महाशिवआघाडीची सत्ता स्थापन होईल. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, असा शब्द उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिला होता. त्यांचा शब्द खरा करण्यासाठी आपण प्रयत्न करु, असं भुजबळांनी सांगितलं.
बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्विटरवरुनही श्रद्धांजली अर्पण केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेबांना ट्विटरवरुन आदरांजली वाहिली आहे. "प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला. समाजकारणाला अग्रक्रम देणारं राजकारण, अमोघ वक्तृत्व, रोखठोक स्वभाव यामुळेच त्यांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन!", असं ट्वीट शरद पवारांनी केलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं. "स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला. आमचे प्रेरणास्थान, हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी शत शत प्रणाम", असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलं.