कल्याण : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात शनिवारपासून आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र दोनच दिवसात, म्हणजे सोमवारी संध्याकाळी हा लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत नवीन आदेश जारी केले आहेत. 

शिवसेनेच्या विरोधानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी हा लॉकडाऊन मागे घेतला आहे. बदलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आठ दिवसाचा कडकडीत लॉकडाऊन बदलापूर शहरात लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमध्ये मेडिकलची दुकानं आणि दवाखाने वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. 

Lockdown Update | राज्यात लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता

मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी या लॉकडाऊनबाबत मुख्याधिकार्‍यांना सूचना केली होती. मात्र अचानक हा लॉकडाऊन झाल्यामुळे बदलापूरकरांमध्ये रोषाचं वातावरण होतं. त्यातच रमजान ईद आणि अक्षयतृतीया यांसारखे सण तोंडावर असताना लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे नाराजीचं वातावरण पाहायला मिळत होतं. या लॉकडाऊनला शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी विरोध करत कुणालाही विचारात न घेता मनमानी पद्धतीने हा लॉकडाऊन लावण्यात आल्याचा आरोप केला होता. तसेच याबाबत त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत लॉकडाऊन मागे घेण्याची मागणी केली होती. 

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स, सरकारचा निर्णय

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना याबाबतच्या सूचना दिल्या आणि अखेर आज सोमवारी संध्याकाळी बदलापूर शहरातील हा आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन मागे घेण्यात येत असल्याची नवी सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केली. यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत बदलापूर शहरात सकाळी 7 ते 11 या वेळेत सर्व दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. तर त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं सुरू ठेवता येतील.

कोरोना योद्ध्यांची मृत्यूनंतरही परवड, केवळ 27 टक्के कुटुंबांनाच 50 लाखांच्या विमा योजनेचा लाभ