बदलापूर: बाप्पाच्या आगमनाचा सोहळा आता अवघ्या महिनाभरावर आला आहे. त्यामुळं गणेश मूर्तीशाळांमध्ये कामाला वेग आला आहे. मात्र जसे आपण बाप्पाची वाट बघतोय, तसे त्याचे परदेशातले भक्तही त्याच्या स्वागतासाठी आतूर झाले आहेत. त्यामुळंच बदलापूरच्या आंबवणे बंधूंच्या चित्रशाळेतून मॉरीशसला बाप्पा रवाना झाले आहेत.
बदलापूरच्या पूर्व भागात सर्वात जुनी गणेश चित्रशाळा म्हणून आंबवणे बंधूंची गणेश चित्रशाळा प्रसिद्ध आहे. या चित्रशाळेतून दरवर्षी बाप्पा परदेशात जातात. यंदा बाप्पाच्या परदेशवारीचं हे बारावं वर्ष आहे. विशेष म्हणजे यंदा फक्त गणपतीच नव्हे, तर गौरी आणि दुर्गामातेच्या मूर्त्यांनाही परदेशातून मागणी आली आहे. त्यामुळं यंदा गौरी आणि देवीच्या मूर्त्याही परदेशात रवाना झाल्या आहेत.
मूर्त्या प्लास्टिकमध्ये पॅक करून नंतर बॉक्समध्ये ठेवल्या जातात आणि कंटेनरमधू 22 दिवसांचा सागरी प्रवास करून मॉरीशसला दाखल होतात.
आंबवणे बंधूंच्या या मूर्तीशाळेत बाराही महिने गणेशमूर्त्या घडवण्याचं काम सुरू असतं. यासाठी 40 कामगार वर्षभर इथं काम करतात. त्यांनी घडवलेल्या105 प्रकारच्या सुमारे 7 हजार मूर्त्यांना मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातून मोठी मागणी असते.
या कारखान्यातून सर्वप्रथम 12 वर्षांपूर्वी 200 मूर्त्या परदेशात रवाना झाल्या होत्या. तर यंदा हा आकडा 700 वर गेला आहे. 72 वर्षांपासूनच्या या व्यवसायात आंबवणे बंधूंची तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे. बदलत्या काळानुसार आता इंटरनेटवरुनही हवी ती बाप्पाची मूर्ती निवडता येत असल्यानं बदलापूरच्या बाप्पाला परदेशात मागणी वाढू लागली आहे.
बदलापूरचे बाप्पा समुद्रामार्गे मॉरिशसला रवाना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jul 2017 12:16 PM (IST)
बाप्पाच्या आगमनाचा सोहळा आता अवघ्या महिनाभरावर आला आहे. त्यामुळं गणेश मूर्तीशाळांमध्ये कामाला वेग आला आहे. मात्र जसे आपण बाप्पाची वाट बघतोय, तसे त्याचे परदेशातले भक्तही त्याच्या स्वागतासाठी आतूर झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -