बदलापूर : खड्ड्यांनी त्रस्त झालेले बदलापूरचे नागरिक आता स्वतःच खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. विशेष म्हणजे फेसबुकवर याबाबत आवाहन करण्यात येत असून त्याला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. खड्डे बुजवणारे हे सगळे बदलापूरकर नोकरी करणारे आहेत. केवळ सुट्टीच्या दिवशी एकत्र येऊन ते खड्डे बुजवण्याचं काम करतात.
बदलापूरच्या कात्रप, डी मार्ट, अंबरनाथ रोड भागात पावसाळा सुरू झाल्यापासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र हे खड्डे बुजवले जात नसल्याने बदलापूरच्या महेश आपटे यांनी फेसबुकवर लोकांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. त्यानंतर प्रत्येक सुट्टीच्या दिवशी बदलापूरकर एकत्र येऊन खड्डे बुजवण्याचं काम करु लागले.
रस्त्याच्या कडेला पडलेली खडी, ग्रीट पावडर, पेव्हर ब्लॉक आपल्या गाडीत भरायचे आणि खड्डे असलेल्या ठिकाणी जाऊन बसवायचे, हा नित्यक्रम मागील काही दिवसांपासून सुरु आहे. या नागरिकांमध्ये तरुण, महिला आणि वृद्धांचीही संख्या मोठी आहे. या उपक्रमाचं सध्या बदलापूर आणि अंबरनाथमध्ये कौतुक होत आहे. मात्र सरकारी यंत्रणांनी अजूनही याची दखल घेतलेली नाही.