मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात पहिल्यांदा तीन आरोपींची नावं समोर आली होती. काल चौथ्या आरोपीचं नाव निष्पन्न झालं होतं. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मोहम्मद झीशान अख्तर हा आरोपी फरार आहे. याशिवाय शिवकुमार गौतम देखील फरार आहे. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरु आहे. मोहम्मद झीशान अख्तर याचं सौरभ महाकाळ कनेक्शन समोर आलं आहे. 


मोहम्मद झीशान अख्तर सौरभ महाकाळचा मित्र


बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी धर्मराज कश्यप, गुरमैल सिंग या दोघांना अटक केलं आहे. तर, शिवकुमार गौतम हा आरोपी फरार आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीनंतर मोहम्मद झीशान अख्तर याचं नाव समोर आलं होतं. तो अजून फरार असून त्याचं आणि सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पोलिसांचा ज्याच्यावर संशय होता त्या सौरभ महाकाळ या दोघांचं कनेक्शन उघड झालं आहे. सौरभ महाकाळ हा  मोहम्मद झीशान अख्तर याचा मित्र असल्याचं समोर आलं आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांना धमकीचं पत्र मिळालं होतं. त्यावेळी मुंबई क्राइम ब्रँचच्या एका टीमनं सौरभ महाकाळ याची पुण्याला जाऊन चौकशी केली होती.  सौरभ महाकाळ याचं खरं नाव सिद्धेश कांबळे असं आहे.  


बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात तीन जणांना अटक


मुंबई पोलिसांनी आतापर्यंत बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धर्मराज कश्यप आणि गुरमैल सिंग या दोघांना अटक केली आहे. शिवकुमार गौतम आणि मोहम्मद झीशान  या दोघांचा शोध सुरु आहे. दोघेही फरार आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाची जबाबदारी घेणाऱ्या शुभू लोणकर याच्या भावाला देखील पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण लोणकर असं अटक करण्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीचं नाव आहे. 


बाबा सिद्दिकी यांच्यावरील दोन हल्लेखोरांना किला कोर्टानं 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलीस आणखी कुणाला अटक करणार याकडे लक्ष लागलं आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींनी वांद्रे पूर्व येथे तीन ते चार वेळा रेकी केली होती, अशी माहिती होती. बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यापूर्वी आरोपी पुण्यामध्ये आले होते. पुण्यातून ते मुंबईत ये जा करत होते. 


इतर बातम्या :