मुंबई : महिला रात्रीच्या वेळी मुंबईत सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पुन्हा एकदा घाटकोपरमधील घटनेने निर्माण झाला आहे. रिक्षाचालकाने काल रात्री वर्सोवा-घाटकोपर लिंक रोडवर एका 22 वर्षीय तरुणीला मारहाण करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

घाटकोपर पोलिसांनी मेरू युनूस खान या रिक्षाचालकला घाटकोपरच्या आझाद नगर भागातून अटक केली.

या तरुणीने काल रात्री हिरानंदानी येथून कलिना येथे तिच्या घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली होती. मात्र रिक्षाचालकाने मित्राला मोबाईल देण्याच्या बहाण्याने घाटकोपरला रिक्षा घेऊन आला. तिथे घाटकोपर वर्सोवा लिंक रोडवर त्याने पार्किंग केलेल्या बसच्या मागे घेऊन जात मारहाण करत तिचा विनयभंग केला.

मारहाणीनंतर रिक्षाचालकाने तरुणीची पर्स आणि मोबाईल घेऊन पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तसेच या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार रिक्षा चालकाचा शोध घेतला.

घाटकोपर पोलिसांनी कलम 397,354 आणि 367 अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी रिक्षाचालकाला अटक केली.