मुंबईत ऑफिसवरुन परतणाऱ्या महिलेवर हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 06 Jan 2017 07:38 AM (IST)
मुंबई: बंगलोरमधील विनयभंगाची घटना ताजी असतानाच, इकडे मुंबईतही तसाच काहीसा प्रकार घडला. मुंबईत काल रात्री ऑफिसवरुन परतणाऱ्या महिलेवर अज्ञात इसमाने हल्ला करुन तो फरार झाला. रेसकोर्स भागात ही घटना घडली. या घटनेनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्या महिलेला नायर रूग्णालयात दाखल केलं. या महिलेवर कोणी आणि का हल्ला केला हे अजून स्पष्ट झालेलं नाही, मात्र एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्या जवळपासच पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. 28 वर्षीय महिलेवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिस आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. बंगलोरमधील विनयभंगप्रकरणी चौघे अटकेत बंगलोरमधील तरुणीच्या विनयभंग प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. बंगलोरचे पोलीस आयुक्त प्रवीण सूद यांनी ही माहिती दिली. यामध्ये अयप्पा, लेनो, सोम आणि सुदेश यांचा समावेश आहे. 31 डिसेंबरला तरुणीचा विनयभंग करण्याआधी हे चौघेजण तब्बल आठवडाभर तिचा पाठलाग करत होते. तिच्याशी असभ्य वर्तन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली. त्यानंतर ही कारवाई कऱण्यात आली.