घरासमोर मेलेले उंदीर टाकल्याने तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 06 Aug 2018 11:21 PM (IST)
अंबरनाथमधील आंबेशिव गावातल्या भोपीवाडी परिसरात रविवारी ही घटना घडली.
NEXT PREV
अंबरनाथ : घरासमोर मेलेला उंदीर टाकल्यानं वाद होऊन एकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातल्या आंबेशिव गावात घडली आहे. या घटनेत शिवाजी भोपी हे गंभीर जखमी झालेत. आंबेशिव गावातल्या भोपीवाडी परिसरात रविवारी ही घटना घडली. शिवाजी भोपी आणि त्यांचे कुटुंबीय घराबाहेर गप्पा मारत बसलेले असताना शेजारी राहणाऱ्या रमाबाई भोपी यांनी मेलेला उंदीर आणून त्यांच्या घरासमोर टाकला. यावेळी शिवाजी यांनी त्यांना हटकत घरात दुर्गंधी येईल, त्यामुळे उंदीर दुसरीकडे टाकण्यास सांगितलं असता त्यांच्यात वाद झाला आणि त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं. यावेळी शिवाजी यांच्यावर 10 ते 12 जणांनी तलवार, कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवला. यात शिवाजी यांच्या डोक्याला, डाव्या हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.