नवी मुंबई : सहाय्य्क पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी काही वस्तूंची पुन्हा खाजगी लॅबमधून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पोलिसांनी आज अश्विनी यांच्या मुलीच्या रक्ताचे नमुने घेतले. रक्ताचे हे नमुने दिल्लीतील एका लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.


आरोपी अभय कुरंदकर यांच्या घरातील एकूण 41 वस्तूंची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये घटनास्थळी सापडलेले केस, भिंतीचं प्लॅस्टर, माती यांचा समावेश आहे. यामुळे नवीन धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याआधी या सर्व वस्तूंचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे मिळालेले केस स्त्रीचे नसल्याचंही या रिपोर्ट्समधून समोर आल्याने बिद्रे यांच्या कुटुंबियांनी यावर संशय व्यक्त केला होता. या सर्व वस्तूंची तपासणी खासगी लॅबमधून करण्याची मागणीही अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांनी केली होती.

नवी मुंबई पोलिसांनी बिद्रे कुटुंबियांची मागणी मान्य करत सर्व वस्तू पुन्हा तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी नवीन पुरावे हाती लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

काय प्रकरण आहे?

15 एप्रिल 2016 पासून अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप कुटुंबाने केला होता. या तपासात पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

अश्विनी जयकुमार बिद्रे... कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक महत्त्वकांक्षी तरुणी. त्या 2000 सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं.

पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.

अश्विनी आणि अभय यांच्यात वाद

अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरने अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही पतीला दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत? या आशयाचं पत्र पोलिस खात्यानेही पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली.

अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनी यांनी आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला, त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदकरने भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं उघड झालं. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय करुंदकर तात्काळ रजेवर गेला. दरम्यान, अश्विनी बिद्रेंची हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.