मुंबई : मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासंदर्भात संजय निरुपम यांनी त्यांची भूमिका मांडली. त्या भूमिकेवर पक्षाच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेऊ, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.


मुंबई महापालिकेत युती-आघाडीबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. मात्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्थानिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी आघाडी नको, अशी भूमिका 'माझा कट्टा'वर मांडली.

“आघाडी नसताना आम्ही 70 जागा जिंकलो, पण आघाडी झाल्यावर 52 जागा जिंकलो होतो, यावेळी आघाडी न करण्याचा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे. एकाही नेत्याची राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची इच्छा नाही आणि माझंही तेच मत आहे,” असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं. त्यावर बोलताना 'निरुपम यांनी त्यांची भूमिका मांडली. त्या भूमिकेवर पक्षाच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेऊ', असं चव्हाण म्हणाले.

आताच्या बैठकीत जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीतील आघाडीबाबत चर्चा करू, तसंच पक्षाची व्यूहरचना ठरवू, असं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं. शिवसेना-भाजप विभक्त असल्याचं दाखवतात, मात्र ते एकच असतात, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी हाणला.

मुंबई जिंकण्यासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला, निरुपम यांचे तीन मुद्दे


भाजप आणि शिवसेनेशी दोन हात करायचे असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणं आवश्यक असल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलं होतं. काँग्रेसचे नेते जर आघाडीबाबत सकारात्मक असतील तर त्याचं स्वागतच आहे असं मत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जाणीवपूर्वक काही विधानं केली जात असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.