मुंबई : ''शिवसेनेचा बालहट्ट मोठा भाऊ म्हणून भाजप पुरवेल. 18 फेब्रुवारीला भाजप आपली सभा मुंबईतील बीकेसी मैदानाऐवजी सोमय्या मैदानावर घेईल. शिवसेनेसाठी बीकेसी सोडलं'', असं स्पष्टीकरण भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलं आहे.


मुंबईतील बीकेसी ग्राउंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरून शिवसेना- भाजप आमने- सामने उभे ठाकले होते. मुंबई महापालिका निवडणुकीची शेवटची प्रचार सभा 18 फेब्रुवारीला होणार आहे.

या सभेच्या परवानगीसाठी शिवसेनेने MMRDA ला 12 जानेवारीला पत्र दिलं आहे. मात्र या ठिकाणी भाजपच्या सभेला परवानगी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दबाव टाकत असल्याचा आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला होता. मात्र आशिष शेलार यांनी भाजपला मोठा भाऊ म्हणत बीकेसी मैदान शिवसेनेसाठी सोडत असल्याचं सांगितलं.

शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

शिवसेनेने आधी तेजस ठाकरेंना मैदानात आणलं, पण काही तरी गडबड आहे दिसलं. त्यामुळे तेजस ठाकरे आता कुठे दिसत नाहीत, असा टोला शेलारांनी लगावला.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रचार सभांचा नारळ फुटला पण आता ते सभेत दिसत नाहीत. हा शिवसेनेचा यू टर्न आहे, असा घणाघातही शेलारांनी केला.

शिवसेना घाबरली आहे म्हणून उद्धव ठाकरे मुलुंडची बॉर्डर सोडून ठाणे, पुणे, नाशिक, अकोला या महापालिकांच्या प्रचाराला जात नाहीत. मुंबई सोडून जाण्याची त्यांची हिंमत नाही, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईसह विदर्भापर्यंत सभा घेत आहेत, असंही शेलार म्हणाले.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना आमंत्रण देऊन माझं काम हलकं केलं आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीशिवाय भाजपचा महापौर बसणार नाही, असा टोलाही शेलारांनी लगावला.

संबंधित बातमी : 'बीकेसी'वर शेवटची प्रचारसभा शिवसेनेची की भाजपची?