मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार हे एकमेकांचे पक्के मित्र म्हणून ओळखले जातात. पण आता याच मैत्रीमध्ये दुरावा आल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबतच्या बातमीवर जेव्हा आशिष शेलारांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा शेलारांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली. आता वैयक्तिक मित्र विषय संपला असं म्हणत आशिष शेलार यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. 

राज ठाकरेंशी हातमिळवणी करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणात काही अटी ठेवल्या. मात्र ती अट आहे की राजकीय कट आहे अशी शंका भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी उपस्थित केला. 

आशिष शेलारांच्या वक्तव्याने वाद वाढला

राज ठाकरे यांच्याकडून एका भाषणात विधानसभेतील आमदारांसंदर्भात बोलताना खोकेबहाद्दर असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आपल्या पक्षाचा एकही आमदार, खासदार नसणाऱ्यांनी यावर बोलू नये असं आशिष शेलार म्हणाले. इथूनच राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यातील वादाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. 

वाद वैयक्तिक गेल्याने राज ठाकरे यांच्याकडून देखील पक्षातील नेत्यांना थेट शेलारांना टार्गेट करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर संदीप देशपांडे यांच्याकडून आशिष शेलार यांच्यावर टीका करताना 'आशिष झोलार' असा उल्लेख करण्यात आला. सोबतच, मनसेच्या मंचावरुन थेट टिका करत आशिष शेलार यांच्यावर व्यंगात्मक कविता करण्यात आली. त्यानंतर आता आशिष शेलार यांच्याकडून वैयक्तिक मित्र वगैरे होते असं म्हणत मैत्री संपल्याचं स्पष्ट करण्यात आलं. 

याआधीही दोन्ही मित्रांमध्ये राजकीय वाद होताना दिसले आहेत. 2019 साली राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडीओ'ला आशिष शेलार यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते. आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या सभेला व्हिडीओ लावतच उत्तर दिलं होतं. मात्र, आता दोघांच्या मैत्रीत पहिल्यांदाच वैयक्तिक वाद निर्माण झाल्याचं दिसतंय.

ठाकरे बंधू एकत्र येणे भाजप नेत्यांना अडचणीचे

ठाकरे बंधू एकत्र येणे हे भाजपसाठी अडचणीचे ठरू शकते. आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. त्यामुळेच शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येऊ नये यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्न केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरे बंधू एकत्र येणार? 

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी एक चर्चा असते ती म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का? ही आता ही चर्चा गंभीर वळणावर गेली आहे. त्याचं कारण खुद्द राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि एकत्र येण्याचे संकेत दिलेत. त्यांच्या या टाळीला उद्धव ठाकरे यांनीही वेळ न दवडता तात्काळ प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातली भांडणं किरकोळ आणि क्षुल्लक आहेत, अशा निसंदिग्ध शब्दांत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना संकेत दिले. त्याहीपुढे जात एकत्र येणं हे कठीण नाही, पण प्रश्न इच्छेचा आहे असं राज ठाकरे म्हणाले. महेश मांजरेकर यांच्या यूट्यूबवरील मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. 

राज ठाकरे यांच्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देणार याची उत्सुकता होती. राज यांची मुलाखत प्रसारित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी यावर उत्तर दिलं. आपल्याकडून भांडण नव्हतं, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायलाही तयार आहोत असं उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं. पण त्यासोबतच राज ठाकरेंसमोर एक अटही ठेवली. भाजपसोबत जायचं आहे की आपल्यासोबत ते ठरवा. महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याच्या पंक्तीला बसणार नाही, याचा निर्णय घ्या असं उद्धव ठाकरे म्हणाले.