मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरांतील दुसऱ्या टप्प्यातल्या नालेसफाईचा पाहणी दौरा केला. भाजप नालेसफाईच्या कामाबाबत 100 टक्के असमाधानी असून नालेसफाई कामात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला आहे.

गाळाचं वजन करणाऱ्या मिरा भाईंदर येथील वजनकाटा केंद्राच्या पावत्या बोगस असल्याचा दावा शेलार यांनी केला. गेल्या वर्षी याच वजनकाट्याच्या घोटाळ्यावर मुंबईकरांना 'काटा रुते कुणाला' हा प्रश्न पडला होता. या वर्षी आम्हाला हिंदी गाण्याचा आधार घ्यावा लागत आहे आणि 'काटा लगा' असं म्हणावं लागत आहे, असंही आशिष शेलार म्हणाले.

नालेसफाईची कामं कधीच पूर्ण होत नसतात...: उद्धव ठाकरे


'काल ज्यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली, त्यांनी स्वत:च नालेसफाई 100 टक्के होऊ शकत नाही, असं म्हटलं. त्यामुळे जे बोलतो ते करुन दाखवतो, असं म्हणणारे आता करुन दाखवू शकत नाही असं म्हणत आहेत.' असा टोला नाव न घेता आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.

'करुन दाखवतो म्हणणाऱ्यांनी आता स्वत:च्या हिमतीवर रस्त्यांची कामंही करुन दाखवावी. खडी प्रश्नाचे बहाणे पुढे करु नयेत. महापालिकेकडे स्वत:चा मोठा अर्थसंकल्प आहे, कोट्यवधींच्या ठेवी आहेत. तो पैसा वापरावा आणि मुंबईकरांना चांगले रस्ते द्यावेत. जबाबदारी ढकलु नये' असा सल्ला शेलारांनी दिला.

सलमानची पाठराखण दुर्दैवी

एखाद्या अभिनेत्याची पाठराखण करणं ही दुर्दैवी बाब असल्याचं मत, आशिष शेलार यांनी सलमान खानच्या घरासमोरील टॉयलेट प्रकरणी व्यक्त केलं. सलमान खानच्या घरासमोर असलेल्या शौचालयाला हटवण्याचा आदेश महापौरांनी दिला आहे. याबाबत मी महापौरांचा निषेध करतो, असंही ते म्हणाले.

क्लीन चिट दौरा

शिवसेनेचा कालचा दौरा हा नालेसफाईचा दौरा नाही तर घोटाळेबाज कंत्राटदारांना क्लीन चिट देणारा दौरा होता. नालेसफाई घोटाळा झालाच नाही म्हणणारे नेते महापालिकेनंच ब्लॅकलिस्टेड केलेल्या कंत्राटदारांना अप्रत्यक्षपणे क्लीन चिट देऊ पाहत आहेत, असा घणाघातही त्यांनी केला.

राणी बागेतील शुल्कवाढीला विरोध

राणी बागेत प्रवेश शुल्क वाढवण्याच्या भाजप विरोधातच आहे, अशी स्पष्टोक्ती शेलारांनी दिली. फेरफटका मारण्यासाठी मुंबईकरांना 100-150 रुपये मोजावे लागत असतील, तर ते चुकीचे आहे, असंही शेलार म्हणाले.