मुंबई: 'काही पक्षांना पोटशूळ होताना दिसतो आहे. त्यावर वेळीच इलाज केलेला बरा.' अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी केली आहे. मेट्रो-3 साठी मुंबईतील गिरगाव, काळबादेवी भागातील घरं विस्थापित होणार नसून त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन होणार असल्याचं शेलारांनी स्पष्ट केलं.


 

याशिवाय मेट्रो-3 च्या प्रस्तावाला आधी विरोध करून नंतर प्रस्ताव स्विकारल्यासंदर्भात राज्यसरकारनं महापालिकेला 15 दिवसांच्या आत उत्तर देण्याची नोटीस बजावली.

 

'भाजपची भूमिका ही मुंबई विकासाची आहे. मेट्रो 3 बाबत आलेल्या प्रस्तावाला शिवसेनेसह इतर पक्षांनी विरोध केला. मात्र त्यानंतर महापालिका सुधार समितीने प्रस्ताव स्वीकारला.' असंही शेलार म्हणाले.

 

दरम्यान, मुंबईत मेट्रो-3 प्रकल्पावरुन शिवसेनेने विरोध दर्शवला होता. त्यामुळे सेना-भाजपात नवा वाद सुरु झाला होता.

 

'ज्यांच्या इमारती बाधित होणार आहेत त्यांना त्याच भागात दुप्पट क्षेत्रफळाची घरं मिळणार आहेत. मेट्रो-3 20 मीटर खोलीवरुन जाणार आहे. त्यामुळे इमारतीच्या बांधकामावर त्याचा परिणाम होणार नाही.' असं शेलार यांनी म्हटलं होतं. 'त्यामुळे शिवसेनेचा नेमका विरोध मेट्रोला आहे की विकासाला?' असं विचारत शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली होती.