मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून वादग्रस्त कार्टून छापल्यानंतर आता शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपसह सगळेच राजकीय पक्ष सरसावले आहेत.

'सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे आजपर्यंतचे उपद्व्याप पाहता त्यांनाच कार्टून म्हणावंस वाटतं.' अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे कार्टूनवरुन शिवसेना आणि भाजपमध्येही जुंपली आहे. तर याच मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे.


'सामना'त कार्टून छापल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी आणि सरकारनं सामना दैनिकाला देण्यात येणाऱ्या सरकारी जाहिराती तातडीनं बंद कराव्यात अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर राष्ट्रवादीनंही शिवसेनेवर टीका केली आहे.