मुंबई: ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसची मॅच फिक्सिंग झाली आहे.’ असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काल केला.
मुंबईतील 227 उमेदवारांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भाजपच्या उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली. त्यानंतर शेलार बोलत होते. भाजपकडून मुंबई तोडण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप होतो आहे. तो दावा खोडून काढण्यासाठी भाजपनं संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या वीरांची आठवण केली.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या सर्व उमेदवारांचा मेळावा घेऊन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत या सर्वांना पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ देण्यात आली.
दरम्यान, काल भांडूपमध्ये झालेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. ‘मुंबईसह महाराष्ट्राचा लचका तोडू देणार नाही.’ भाजपच्या उमेदवारांनी हुतात्मा चौकात जाऊन प्रचाराला सुरुवात केली. त्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलं.
भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी विदर्भासह संयुक्त महाराष्ट्राची शपथ घ्यावी. असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. शिवाय पारदर्शकतेच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा भाजपवर शरसंधान साधलं. नोटबंदीच्या मुद्द्यावरुन लोकांना होणाऱ्या त्रासाकडंही यावेळी त्यांनी लक्ष वेधून घेतलं.
संबंधित बातम्या:
भाजपच्या मुंबईतील 227 उमेदवारांकडून पारदर्शकतेची शपथ
"पाकिटमार आहात तुम्ही" उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
भ्रष्टाचारात शिवसेनाच नाही, भाजपचाही सहभाग : शरद पवार