तुमच्या वृत्तपत्राच्या जाळपोळीस तयार रहा, शेलारांचा इशारा
एबीपी माझा वेब टीम | 26 Jun 2016 06:37 AM (IST)
मुंबई : युतीत भडकलेला वणवा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. ज्यांनी 'मनोगत' पाक्षिकाच्या प्रती जाळल्या त्यांनी स्वतःच्या वर्तमानपत्राच्या जाळपोळीसही तयार राहावं, असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे. विकासाच्या प्रवाहाबाहेर राहणाऱ्यांना एक दिवस जनता लोकशाहीच्या बाहेर ठेवणार, असा टोलाही स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्या सेनेला शेलारांनी लगावला आहे. भाजपचं पाक्षिक असलेल्या 'मनोगत'मधून भाजप प्रवक्ते माधव भांडारींनी उद्धव ठाकरे यांची तुलना शोले चित्रपटातल्या असरानींशी केली होती. त्यानंतर शिवसेनेनं ठिकाठिकाणी आंदोलन करुन या मनोगत पाक्षिकाची होळी केली. भांडारींचा निषेध करत शिवसैनिकांनी नागपुरात त्यांचा पुतळा जाळला गेला. त्यानंतर शेलारांनी सेनेला इशारा देत आम्ही 'दैनिक सामना'च्याही प्रती जाळू शकतो असा इशारा दिला.माधव भांडारींनी नुकतंच शिवसेनेला आपल्या लेखातून घटस्फोट घ्या असे आवाहन दिलं होतं. भाजप नेत्यांनी ताबडतोब हे भांडारींचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत पक्षाला त्या भूमिकेपासून दूर केलं. मात्र शिवसेनेने ताबडतोब पलटवार केला. नागपुरात शिवसैनिकांनी एक पत्रक काढून भाजपला 'शोले'मधील सुरमा भोपाळी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शकुनीमामा असल्याचं हिणवलं.