मुंबई : मुंबईतील एलफिन्स्टन रोड, करी रोड आणि आंबिवली स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज बांधण्याची जबाबदारी भारतीय सैन्याकडे देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल, संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांनी आज एल्फिन्स्टन पुलाची पाहणी केली. त्यावेळी ही घोषणा करण्यात आली.


एलफिन्स्टन स्टेशनच्या फूट ओव्हर ब्रीजवर 29 सप्टेंबर रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत 23 मुंबईकरांचा मृत्यू झाला होता.

31 जानेवारी, 2018 पर्यंत काम पू्र्ण : रेल्वेमंत्री
एरव्ही या कामाला एक वर्ष लागलं असतं मात्र आता हे काम दोन महिन्यात पूर्ण होईल. भारतीय सैन्य एलफिन्स्टन, करी रोज आणि आंबिवली स्टेशनवरील फूट ओव्हर ब्रीज 31 जानेवारी 2018 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून मदत
एलफिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीनंतर भारतीय सैन्याकडून मदत मागितली होती. यानंतर संरक्षण मंत्रालयाने मदतीची तयारी दर्शवली. तीन ब्रीजचं बांधकाम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कामाच्या प्रत्येक टप्प्यात सैन्य इथे असेल : संरक्षण मंत्री
नागरी कामासाठी सैन्याची मदत मागण्याची ही कदाचित पहिली वेळ असावी, पण एलफिन्स्टन दुर्घटना फारच मोठी होती, असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. तसंच सैन्याने इथे येऊन पाहणी केली, ब्रीज कुठे बांधवा याचं मूल्यमापन केलं. कामाच्या प्रत्येक टप्प्यात सैन्य इथे असेल, असं आश्वासनही संरक्षण मंत्र्यांनी दिलं.

सैन्याची मदत कशाला?
आपत्कालीन स्थितीत पूल बांधणीचं प्रशिक्षण मिलिटरी इंजिनीअरिंग विंगला असतं.

राष्ट्रकुल स्पर्धेवेळी दिल्लीत पूल पडल्यानंतर तातडीने सैन्याने पूल उभारला होता.

नैसर्गिक आपत्तीवेळी अनेक कामं भारतीय सैन्याने झटपटपणे केली आहेत.

सैन्याऐवजी रेल्वेने पूल बांधणी केली असती तर त्याला एक वर्ष लागलं असतं.

पूल बांधकामाच्या साध्या टेंडर प्रक्रियेतच 1 ते 2 महिने वाया जातात.

29 सप्टेंबरला टेंडर निघालं होतं, ज्याची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही.

संबंधित बातमी

एलफिन्स्टनचा फूट ओव्हर ब्रीज मिलिटरी बांधणार