मुंबई : मुंबई मेट्रोच्या दोन नव्या मार्गांना आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या नव्या मार्गांमध्ये मार्ग- 2 ब आणि मेट्रो मार्ग- 4 या प्रकल्पांचा समावेश आहे.
मेट्रो मार्ग- 2 ब मध्ये डीएन नगर ते मंडाळे या 24 कि.मी.च्या मार्गावर 22 स्थानके आहेत. यासाठी 10 हजार 970 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत हा मार्ग पूर्ण केला जाणार आहे. 2021-22 या कालावधीत 9 लाख, तर 2031-32 या कालावधीत मेट्रोचे दररोज 11 लाख प्रवासी असतील.
तर दुसऱ्या मार्गामध्ये वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या 33 कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग- 4चा प्रकल्प असेल. या प्रकल्पात 32 स्थानके उभारली जाणार आहेत. हा मार्ग पूर्ण करण्यासाठी 14 हजार 549 कोटींचा निधी लागणार आहे. हा प्रकल्प एप्रिल 2017 ते जुलै 2021 या 52 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केला जाणार आहे. या मार्गावर 2021-22 मध्ये 9 लाख, तर 2031-32 मध्ये दररोज 12 लाख प्रवासी असतील.
या दोन्ही प्रकल्पांस मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.