CM Eknath Shinde : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांनी (CM Eknath Shinde-Devendra Fadnavis) शपथ घेऊन 26 दिवस उलटले आहेत. 26 दिवसात मुख्यमंत्री शिंदेंनी पाच वेळा दिल्ली दरबारी हजेरी लावली आहे. 26 दिवसात एकनाथ शिंदेंनी एकूण 8 मोठे निर्णय (Maharashtra Cabinet) घेतले आहेत, ज्यांचा थेट धोरणांशी संबंध आहे. तर या 26 दिवसात शिंदे-फडणवीसांची पाच वेळा कॅबिनेट बैठक झाली आहे. 


शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मागच्या ठाकरे सरकारचे काही निर्णय स्थगित केले आहेत. यावरुन विरोधकांनी टीका देखील केली आहे. तसेच अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने देखील विरोधकांनी सरकारवर धारेवर धरले आहे. असं असलं तरी शिंदे आणि फडणवीसांच्या मंत्रिमंडळाने 8 महत्वाचे निर्णय घेतले आहेत. 
 
कुठले महत्त्वाचे 8 निर्णय घेतले?


1. बुलेट ट्रेन मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मविआ सरकार सत्तेत आल्यानंतर तो थंड्या बस्त्यात होता. शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यावर मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेला बीकेसीत अंडरग्राऊंड स्टेशन उभारण्यासाठी टेंडर काढण्यात आलं



2. शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर 24 तासात आरेतल्या कारशेडवरची स्थगिती उठवली. अडीच वर्षापासून नव्या जागेच्या शोधात मविआ सरकार होतं. मात्र पुन्हा कारशेड आरेतच करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला



3. मेट्रो 3 च्या मुख्य व्यवस्थापकपदी अश्विनी भिडे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. मविआच्या काळात त्यांच्याकडून मेट्रोची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. ती रणजितसिंह देओल यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर या पदावर श्रीनिवास यांची नियुक्ती होती. आता पुन्हा भिडेंनी कारभार हाती घेतला आहे.



4. फोन टॅपिंग केस सीबीआयकडे सोपवण्यात आली. आयपीएस रश्मी शुक्लांनी 2019 ला विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. त्या तत्कालीन एसआयडीच्या प्रमुख होत्या. याप्रकरणी मविआनं त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता



5. शेवटच्या कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरणाचा निर्णय घेतला. शिंदेंनी त्याला स्थगिती दिली होती. तिसऱ्या कॅबिनेटमध्ये पुन्हा शिंदेंनी औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव करण्याचा निर्णय घेतला



6. माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांनी जबरदस्तीनं, दमदाटी करुन शिक्षण संस्था ताब्यात घेण्यासाठी दबाव आणल्याचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणी पुण्यात केस दाखल करण्यात आली होती. जळगावमधून काही लोकांना अटकही झाली होती. आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे.



7. गेली दोन वर्ष कोरोनाच्या काळात सणवार आणि उत्सवांवर निर्बंधांचं सावट होतं. ते आता दूर झालंय. शिंदे-फडणवीसांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन सगळे सणवार निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतला. शिवाय गणपती मूर्तींच्या उंचीवरचे निर्बंध हटवले..



8. मोदींनी 18 राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती, त्यात गतिशक्ती, हर घर जल सारख्या योजना जोरदार पद्धतीनं राबवण्याचे आदेश होते. त्याप्रमाणं राज्यानंही या उपक्रमांना गती दिली..



संबंधित बातम्या