Apple Mumbai Store: भारतात ॲपल (Apple) चे पहिले रिटेल स्टोअर सुरू करण्यात आले आहे. ॲपलचे भारतातील पहिले स्टोअर हे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, म्हणजेच बीकेसी येथे सुरू झाले आहे. बीकेसीतील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये अॅपलचे हे पहिले अधिकृत स्टोअर आता ग्राहकांसाठी खुले झाले आहे. अॅपल स्टोअरच्या उद्घाटनासाठी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक हे कालच मुंबईत आले होते आणि आज त्यांच्या हस्ते स्टोअरचे उद्घाटन पार पडले. स्टोअरचे उद्घाटन केल्यानंतर टिम कुक यांनी स्टोअरचा दरवाजा उघडत स्वतः ग्राहकांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो अॅपलचे चाहते, ग्राहक आणि अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील पहिल्या अॅपल स्टोअरच्या ग्रँड ओपनिंगमुळे ग्राहक खुश
मुंबईतील पहिल्या अॅपल स्टोअरच्या उद्घाटनावेळी शेकडो ग्राहक उपस्थित होते आणि हे स्टोअर 20,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. लोकांमध्ये ॲपल उत्पादनांची इतकी क्रेझ आहे की स्टोअर उघडण्यापूर्वीच सकाळी 11 वाजल्यापासून स्टोअर बाहेर ग्राहकांची झुंबड उडाली होती. या स्टोअरमध्ये 100 सदस्यांची टीम ग्राहकांसाठी कार्यरत असणार आहे. तर या अॅपल स्टोअरमध्ये तब्बल 20 भाषांमध्ये ग्राहक सेवा उपलब्ध असणार आहे.0
कालच मुंबईत पोहोचले होते अॅपलचे सीईओ टिम कुक
अॅपलचे सीईओ टिम कुक काल म्हणजेच सोमवारी भारतात पोहोचले. यानंतर त्यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी, म्हणजेच अँटिलिया येथे भेट घेतली. याशिवाय अॅपल स्टोअरच्या उद्घाटनापूर्वी काल एका खासगी कार्यक्रमात त्यांनी देशातील प्रसिद्ध व्यक्तींची भेट घेतली. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे, अभिनेत्री माधुरी दीक्षित, रवीना टंडन, नेहा धुपिया आणि गायक अरमान मलिक यांसारख्या देशातील मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींची त्यांनी भेट घेतली.
दिल्लीत 20 एप्रिलला उघडणार अॅपलचे दुसरे स्टोअर
अॅपलच्या मुंबईत उघडलेल्या पहिल्या स्टोअरचे नाव Apple BKC आहे. कंपनी या स्टोअरसाठी दर महिन्याला 42 लाख रुपये भाडे देणार आहे आणि नफ्याचा काही भाग स्टोअर मालकालाही दिला जाईल. यानंतर ॲपलने घोषणा केली आहे की, मुंबईनंतर देशातील दुसरे अॅपल स्टोअर हे 20 एप्रिल रोजी दिल्लीत सुरू होणार आहे. सिलेक्ट सिटी वॉक मॉल, साकेत येथे दुसरे अॅपल स्टोअर सुरू होणार आहे.