मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए मागील अनेक दिवसांपासून मनसुख हिरण हत्या आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलातील तीन पोलिसांचा समावेश आहे. तर एक निलंबित हवालदार आणि एक क्रिकेट बुकी यांनाही अटक करण्यात आली आहे.
ज्या दिवशी म्हणजे 5 मार्च रोजी जेव्हा मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा इथल्या रेती बंदरमध्ये सापडला होता, तेव्हा त्यांचा चेहरा मंकी कॅपने झाकलेला होता. यामध्ये अनेक रुमालही आढळले होते. एनआयएला नुकतंच तपासात समजलं की, "ते सर्व रुमाल 4 मार्च रोजी कळवा रेल्वे स्टेशनच्या बाहेर रुमाल विक्रेत्याकडून खरेदी केले होते. हे रुमाल खरेदी करणारा इसम दुसरा तिसरा कोणी नसून सचिन वाझे होता."
एनआयएच्या सूत्रांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, "त्यांना त्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज मिळालं असून त्यात एक व्यक्ती रुमाल खरेदी करताना दिसत आहे. तो व्यक्ती हूबेहूब सचिन वाझेसारखाच दिसत आहे." यंत्रणेला संशय आहे की त्या सर्व रुमालांचा वापर मनसुख हिरण यांचा चेहरा झाकण्यासाठी केला असावा.
"या प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी आम्ही प्रत्येक बिंदू जोडत आहोत, जेणेकरुन कोर्टातही आरोपींना शिक्षा देता येईल," असं एनआयएच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. याच प्रकरणात एनआयएने त्या रुमाल विक्रेत्याचा जबाबही नोंदवला आहे.
सुरुवातीला सचिन वाझेने सगळ्यांनाच आपण घटनेच्या वेळी मुंबईत असल्याचं खोटं सांगितलं होतं. परंतु एटीएस आणि एनआयएच्या तपासात त्याचं खोटं उघड झालं. दोन्ही यंत्रणांना एवढं सीसीटीव्ही फूटेज मिळालं आहे की, ज्यामुळे सचिन वाझेने सांगितलेली प्रत्येक खोटी ठरत आहे.
सीसीटीव्ही फूटेजनुसार, "सचिन वाझे 4 मार्च रोजी साडेआठ वाजता कळवा स्टेशनवर पोहोचला होता. तिथे उतरल्यानंतर तो स्टेशनजवळच्याच एका रुमाल विक्रेत्याकडे गेला आणि त्याच्याकडून अनेक रुमाल खरेदी केले."
रुमालात क्लोरोफॉर्म सापडलं नाही!
मनसुख हिरण यांना बेशुद्ध करण्यासाठी त्या रुमालांमध्ये कदाचित क्लोरोफॉर्मचा वापर केला असावा, अशी अटकळ यंत्रणांनी सुरुवातीला बांधली होती. हे रुमाल सापडल्यानंतर ते तातडीने मुंबईच्या कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते. मात्र रुमालांमध्ये क्लोरोफॉर्म आढळलं नाही, असा अहवाल कलिना फॉरेन्सिक लॅबने दिला. कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये एकूण सहा रुमाल पाठवण्यात आले होते.
एनआयएने आता सेकंड ओपनियन घेण्यासाठी ते सर्व रुमाल पुण्यातील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
या प्रकरणात अटकेत असलेले निलंबित एपीआय सचिन वाझे, निलंबित हवालदार विनायक शिंदे, क्रिकेट बुकी नरेश गोर आणि निलंबित एपीआय रियाजुद्दीन काजी हे जेल कस्टडीमध्ये आहेत. तर निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने एनआयए कोठडीत आहे.