मुंबई : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकं आणि मनसुख हिरण यांच्या हत्येचा आरोप असलेल्या सचिन वाझे यांच आता टीआरपी घोटाळ्यातही नाव आलं आहे. या घोटाळ्यात बार्कच्या अधिकाऱ्यांकडे सचिन वाझे यांनी 30 लाख रुपयांची लाच मागितल्याची माहिती आता समोर येत आहे. सुत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. टीआरपी घोटाळ्यात मनी लॉण्ड्रिगचा तपास करणाऱ्या ईडीला सचिन वाझे यांच्या व्यवहारांबाबत माहिती मिळाल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. वाझे बार्कच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचा छळ करत होते. तसेच हा छळ टाळण्यासाठी सचिन वाझे यांनी अधिकाऱ्यांकडे 30 लाख रुपयांची मागणी केली होती, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 


काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या टीआरपी घोटाळ्यातील मनी लॉण्ड्रिगचा तपास ईडी करत आहे. ईडीच्या याच तपासात धक्कादायक माहिती समोर आल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. याप्रकरणातही सचिन वाझे यांचा संबंध असल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे. टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असताना सचिन वाझे बार्कच्या अधिकाऱ्यांना त्रास देत असत. आणि हा त्रास टाळण्यासाठी त्यांच्याकडे वाझेंनी 30 लाखांचीही मागणी केल्याचं समोर आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावून घेत आणि त्यांना तासन् तास कार्यालयात बसवून ठेवत असतं. 


ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे लाच घेत असल्याचा आरोप केला होता, त्यांचे जबाब बार्कच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले आहेत. याप्रकरणी ईडी आता याप्रकरणी सचिन वाझे आणि दुसऱ्या क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचेही जबाब नोंदवणार आहे. 


मुंबई पोलिसांच्या इतर अधिकाऱ्यांचाही याप्रकरणाशी संबंध 


बार्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, सचिन वाझे यांनी त्यांच्याकडून धमकावून पैसे घेतले होते. बार्कमधील मोठ्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मोठ्या कंपन्यांशी संबंध आहेत. त्यांच्यावर खोटो आरोप लावून त्यांना अटक करण्याची भीती सचिन वाझे यांनी त्यांना दाखवली होती. याच भीतीमुळे अधिकाऱ्यांनी सचिन वाझे यांना पैसे दिले होते. आता ईडी याप्रकरणाचा तपास करणार असून सचिन वाझे यांनी आणखी कोणत्या अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले होते, याचाही तपास करणार आहे. तसेच इतरही काही पोलीस अधिकाऱ्यांचे याप्रकरणाशी संबंध असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. हे अधिकारी सध्या ईडीच्या रडारवर आहेत. 


दरम्यान, सचिन वाझे सध्या एनआयए कोठडीत आहेत. त्यांच्यावर मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकं आणि मनसुख हिरण यांची हत्या केल्याचा आरोप आहे. सचिन वाझे यांनी टीआरपी घोटाळ्यात एक गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अनेकांना अटकही केली होती. त्यानंतर ईडीने याप्रकरणी मनी लॉण्ड्रिंगच्या अँगलने तपास सुरु केला होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :