मुंबई : अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणात विशेष एनआयए कोर्ट गुरूवारी काही महत्त्वपूर्ण निकाल देणार आहे. याप्रकरणात अटकेत असलेल्या सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेसह इतर दोन आरोपी पोलीस अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या डीफॉल्ट जामीन अर्जावर आणि याप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 30 दिवसांचा अवधी देण्याची मागणी करणाऱ्या एनआयएच्या अर्जावर गुरुवारी विशेष एनआयए न्यायालय निर्णय देणार आहे.


उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. काही दिवसांतच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. तपासयंत्रणांना कोणत्याही प्रकरणात 90 दिवसांत आरोपपत्र दाखल करणं बंधनकारक असतं. मात्र तपासयंत्रणा यात अपयशी ठरल्यामुळे आपल्याला डीफॉल्ट जामीन देण्यात यावा, अशी मागणी करत सचिन वाझेसह अन्य दोन पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. बुधवारी तळोजा कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाझेनं या सुनावणीमध्ये हजेरी लावत स्वतःची बाजू स्वतःच मांडली. 


आरोपीला अटक करण्यात आल्यापासून 90 दिवसांत आरोपपत्र दाखल करणं बंधनकारक आहे. त्याच्यावर अतिरिक्त आरोप लावले तरी आरोपपत्र दाखल करण्याची मुदत ही अटकेपासून मोजण्यात येते, असा युक्तिवाद त्यानं या सुनावणीदरम्यान न्यायाधीश डी.ई. कोथळीकर यांच्यापुढे केला. एनआयएदेखील याला अपवाद नसून त्यात ते अपयशी ठरल्यामुळे सीआरपीसी कलम 167 अंतर्गत अटकेच्या 91 व्या दिवशी आपण डिफॉल्ट जामिनासाठी पात्र होत असल्याचं वाझेनं आपली बाजू मांडताना कोर्टात सांगितलं.


तर दुसरीकडे, तपासयंत्रणेनं याप्रकरणी काही गोष्टींचा तपास बाकी असल्यानं आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी एक महिन्याचा अवधी देण्यात यावा अशी मागणी एका अर्जाद्वारे कोर्टाकडे केली आहे. दोन्हीबाजू ऐकुन घेत न्यायालयानं गुरूवारी या अर्जावर निकाल देण्याचे निश्चित केलं आहे.
डिफॉल्ट जामीन मिळवण्याचा वाझेचा हा दुसरा प्रयत्न असून याआधी जून महिन्यात त्यांची याचिका न्यायालयानं फेटाळली होती.