मुंबई : मुंबई विद्यापीठ निकालामुळे सातत्याने चर्चेत आहे. एकीकडे निकाल जाहीर करण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे, तर दुसरीकडे विद्यापीठासमोर अनेक अभ्यासक्रमांच्या निकालांच ओझं आहे. त्यामुळे या पेपर तपासणीमध्ये आता एक नवीन झोल समोर आला आहे.


आतापर्यंत परीक्षेत कॉपी करुन उत्तीर्ण होणारा मुन्नाभाई आपण कधी चित्रपटातून तर कधी प्रत्यक्षात पाहिला आहे. मात्र आता थेट गुरुजीच पेपर तपासणी करताना बनवाबनवी करताना दिसत आहे. मुंबई विद्यापीठातल्या काही शिक्षकांनी प्रॉक्सी अटेंडन्स टाकून चक्क पीएचडीच्या विद्यार्थ्यांवर पेपर तपासणीचं काम सोपवल्याचा आरोप होत आहे.

आधीच मुंबई विद्यापीठाचा निकाल रखडला. रोज 80 ते 90 हजार उत्तरपत्रिका चेक करायचं आव्हान आहे. त्यामुळे विद्यापीठात गडबड सुरु आहे. पण विद्यार्थी पेपर तपासत असल्याचा आरोप विद्यापीठानं फेटाळून लावला आहे.

ऑनलाइन पेपर तपासणीचा घाट कुलगुरुंनी घातल्यानंतर या ना त्या कारणानं निकालाबाबत मुंबई विद्यापीठ चर्चेत राहत आहे. पण अशा प्रकारामुळे मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत आहे.

खरं तर निकलाबाबतचा गोंधळ हा विद्यापीठाला नवा नाही. रोज या निकालाबाबत काही ना काही झोल समोर येत आहे. मात्र यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे निकाल बाकी आहेत, त्यांचं मात्र यात नुकसान होत आहे आणि यावरच विद्यापीठ प्रशासनाने खरं तर सध्याच्या घडीला विचार करायला हवा.