मुंबई : देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेत एका निनावी पत्राने खळबळ उडवली आहे. या निनावी पत्राद्वारे कंत्राटदारांची हातचलाखी उघड करण्यात आली आहे. सॅप प्रणालीमध्ये हस्तक्षेप करत काही मोजक्या कंत्राटदारांना मदत करत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
आयटीचे कर्मचारी, सॅप कंत्राट कंपनीचे कामगार आणि कंत्राटदार यांच्यामधील छुपी कार्यपध्दती बाहेर आणण्याचा प्रयत्न करत या पत्राद्वारे चौकशीची मागणी तक्रारदाराने केली आहे. असे असले तरी या निनावी पत्राची दखल प्रशासन किती घेते, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. परंतु कुठे तरी या पत्राने महापालिका प्रशासनाला विचार करायला भाग पाडले असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी असे कोणतेही पत्र आपल्रयाला मिळाले नसल्याचं म्हटलंय. भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांचा मात्र आपल्याला पत्र मिळाले असल्याचा दावा केला आहे. महापौर आणि इतर गटनेत्यांनाही हे पत्र मिळाले नाही.
पत्र मिळाल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या प्रभाकर शिंदेंनी मात्र हे पत्र दाखवण्यास असमर्थता दर्शवली आहे. सॅप प्रणालीत हस्तक्षेप करीत महापालिका कर्मचारी काही निवडक कंत्राटदारांना मदत करीत असल्याचा आरोप या पत्रात केला आहे. महापालिकेच्या आयटी विभागाचे कर्मचारी, सॅप कंपनीचे कर्मचारी आणि कंत्राटदार यांचे रॅकेट चव्हाट्यावर आणण्याचा निनावी पत्राद्वारे प्रयत्न केला गेला असल्याचा दावा केला आहे.