मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या जवळच्या व्यक्तींवर टाकलेल्या धाडींमुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, सांगली आणि रत्नागिरीतील एकूण 26 ठिकाणी ह्या धाडी टाकण्यात आल्याचं आयकर विभागाकडून स्पष्टकरण्यात आलं आहे. या छापेमारीत किती संपत्ती सापडली याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे.
अनिल परब यांच्या दापोली स्थित जमिनी संदर्भात आयटी विभागाने अनिल परब यांच्या निकटवर्तीयांविरुद्ध धाडी टाकल्या होत्या. यात सरकारी अधिकारी बजरंग खरमाटे आणि संजय कदम यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला.
अनिल परब यांच्या अडचणीत वाढ?
- 2017 साली अनिल परब यांनी दापोलीत भूखंड खरेदी केला. पण त्याची नोंदणी 2019 पर्यंत केली नाही
- ही जमीन एकाला 1 कोटी 10 लाख रुपयांत 2020 साली विकण्यात आली
- 2017 ते 2020 या काळात रिसॉर्टचं बांधकामही झालं
- मात्र या काळात रजिस्ट्री करताना जमिनीचा व्यवहार दाखवत स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली
-दुसरीकडे, कागदोपत्री उभ्या राहात असलेला रिसॉर्टचा उल्लेख त्यात करण्यात आला नाही
- रिसॉर्टच्या बांधकामासाठी 6 कोटींपेक्षा अधिक रपये रोखीने दिल्याचे पुरावे आढळून आले
-सरकारी अधिकारी बजरंग खरमाटे आणि त्यांच्या नातेवाईकांनी राज्यात अनेक ठिकाणी संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे
आयकर विभागाच्या मते, बजरंग खरमाटे यांच्या नातेवाईकांकडे पुण्यात एक बंगला, एक फार्म हाऊस, तासगावमध्ये भव्य फार्म हाऊस, सांगलीत दोन बंगले, तनिष्क आणि कॅरेट लेन शोरुम असलेले दोन व्यावसायिक कॉम्प्लेक्स, पुण्यातील विविधठिकाणी पाच फ्लॅट, नवी मुंबईत एक फ्लॅट, मोकळे भूखंड असा समावेश आहे.
गेल्या सात वर्षात खरेदी केलेल्या100 एकरहून अधिक शेत जमिनी एवढी मालमत्ता खरेदी करण्यासाठी झालेला खर्च करायला पैशांचा स्त्रोत काय होता याचा तपास सुरु आहे. सोबतच रिअल इस्टेटच्या व्यवसायासोबतच इतर व्यवसाय ह्याअधिकाऱ्याच्या मालकीचे असल्याचं आयकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे. सोबतच राज्य सरकारची अनेक कंत्राटं देखील बांधकामव्यवसायिक असलेल्या नातेवाईकाला मिळाल्याचं उघड झालं आहे. या शोध मोहिमेत 66 लाख कॅश, काही डिजिटल पुरावे आणि कागदपत्रही आयकर विभागाच्या हाती लागली आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, आयकर विभागाकडून ही कागदपत्रे ईडीकडे सोपवण्यात येणार आहेत. त्यानंतर ईडीकडून ह्या संपूर्णप्रकरणात गुन्हा दाखल होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी अनिल देशमुख यांच्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव घेत होते. अशातच अनिल परब यांच्या निकटवर्तीयांवर पडलेल्या छापेमारीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता होती. अशातच आता पुढे केंद्रीय सरकारी यंत्रणा यासंदर्भात कशी पाऊलं टाकतात आणि काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असेल.