Anil Deshmukh Resign LIVE: गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख दिल्लीला, ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या घरी खलबत

Maharashtra Home Minister, Anil Deshmukh Resign LIVE Updates: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर आता अनिल देशमुख राजीनामा देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Apr 2021 02:51 PM
गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख दिल्लीला, ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या घरी खलबत

गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी तातडीने दिल्ली गाठली. दिल्लीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत रात्री नऊ ते दहा अशी जवळपास तासभर खलबतं केली. यावेळी राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टातले वकील राहुल चिटणीस आणि इतर जवळपास 5-6 वकिलांची फौजही या निवासस्थानी हजर होती. हायकोर्टानं सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता सुप्रीम कोर्टात याबाबत काय पाऊल उचलता येईल यावर या बैठकीत मंथन झालं आहे. बैठकीनंतर कुठलीही प्रतिक्रिया न देता अनिल देशमुख हे तिथून निघाले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात त्यांचं पुढचं पाऊल आता काय असणार याची उत्सुकता आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार मंत्री, कामगार व राज्य उत्पादन शुल्क दिलीप वळसे पाटील यांचेकडे  देण्यास मंजुरी दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ, मंत्री, ग्राम विकास यांचेकडे देण्यास तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिली आहे.

अनिल देशमुख यांनी चौकशीला सामोरं जावं यासाठीच राजीनामा दिला - छगन भुजबळ

अनिल देशमुख यांनी चौकशीला सामोरं जावं यासाठीच राजीनामा दिला आहे. सुप्रीम कोर्टात दाद मागणार की नाही याबाबत मला कल्पना नाही, परंतु ज्येष्ठ वकीलाशी चर्चा करतील, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. 

अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा, मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र

अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे

अनिल देशमुख यांचा राजीनामा म्हणजे महाविकास आघाडी सरकार पारदर्शक असल्याचा पुरावा : बच्चू कडू

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा म्हणजे महाविकास आघाडी सरकार पारदर्शक  असल्याचा पुरावा असल्याचं  राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटल. अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा त्यांच्यावरील लावलेल्या आरोपांची चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शी व्हावी यासाठी दिला. तर विदर्भातील मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे का?, या प्रश्नाचं उत्तर देतांना त्यांनी यात कोणताही प्रांतवाद दिसत नसल्याचं म्हटलंय. 

आमदार रवी राणा यांचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

आमदार रवी राणा यांचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्या पद्धतीने नैतिक जबाबदारी दाखवत राजीनामा दिला, त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा.आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे आता दूध का दूध पाणी का पाणी होईल.

Anil Deshmukh resign : अनिल देशमुख यांचा शरद पवारांच्या आदेशाने राजीनामा- चंद्रकांत पाटील

अनिल देशमुख यांनी शरद पवारांच्या आदेशाने राजीनामा दिला, उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्रीपद स्वीकारावे, पण सरकारचे किती दिवस शिल्लक आहेत, चंद्रकांत पाटलांचा टोला

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री होण्याची शक्यता : सूत्र

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तर उत्पादन शुल्क खाते अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याचं कळतं.

Anil Deshmukh Resign : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहे.

अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असून तो सोपवण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे रवाना : नवाब मलिक

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असून तो सोपवण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. ते म्हणाले की, "उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना भेटून राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. पवारांनी यासाठी होकार दिला आहे. सीबीआय चौकशी करत असताना गृहमंत्री पदावर राहणं योग्य नाही असं देशमुख म्हणाले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. शेवटी आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवणे गरजेचं आहे. राजीनामा दिला, विषय संपला."

पार्श्वभूमी

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर आता अनिल देशमुख राजीनामा देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.


 


हायकोर्टाने सीबीआय चौकशीच्या निर्देशांनतर विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी झाली तर ही सरकारची नामुष्की असेल. त्यामुळे पक्ष याबाबत ठोस भूमिका घेण्याची दाट शक्यता आहे. परिणामी अनिल देशमुख राजीनामा देण्याची शक्यता आहे.


 


राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी मुंबईतील बारमालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, असा खळबळजनक आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला आहे. या आरोपामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. याविरोधात हायकोर्टात याचिकाही दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने याचिका निकाली काढत 15 दिवसांत सीबीआयला प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.  


 


मात्र परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब सीबीआयने प्राथमिक चौकशी अहवाल देतानाच आताच या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची आवश्यकता नाही, असंही उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. हा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यायाने महाविकास आघाडीला धक्का समजला जात आहे. 


 


परमबीर सिंह यांच्या आरोपाची चौकशी राज्य सरकार करणार
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांची चौकशी करण्याचा महत्त्वाचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. आता या आरोपांच्या चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती सहा महिन्यात या प्रकरणाचा अहवाल देणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.