मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आलं आहे. माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेनं दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं बुधवारी मंजूर केला आहे.


सचिन वाझेनं यासंदर्भात दाखल केलेला अर्ज न्यायाधीश डी.पी. शिंगाडे यांनी मान्य केला. यासुनावणी दरम्यान सचिन वाझेलाही कोर्टापुढी व्ही.सी. मार्फत हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी आता माफिचा साक्षीदार या नात्यानं त्यांची जबाबदारी न्यायाधीशांनी त्यांना तोंडी समजावून सांगतली. तसेच 7 जूनला वाझे यांना प्रत्यक्ष कोर्टापुढे हजर करण्याचे आदेश जारी केलेत जेणेकरून ते माफीचा साक्षीदार बनल्याच्या पत्रकावर स्वाक्षरी करू शकतील. या अर्जाला सीबीआयनंही विरोध न करण्याचा निर्णय घेत निकाल कोर्टावर सोपवला होता.  


सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्यानं मुख्य आरोपी असलेल्या अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारच्या सुनावणीत याच प्रकरणातील अन्य आरोपी आणि देशमुखांचे खासजी स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांनी वाझेंच्या अर्जाला विरोध करत आपला अर्ज कोर्टापुढे सादर केला होता. मात्र एकाच प्रकरणातील आरोपीला दुस-या आरोपीनं माफीचा साक्षीदार होण्यावर कायद्यानं आक्षेप घेता येत नाही, असं स्पष्ट करत सीबीआय कोर्टनं हा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. 


मात्र सचिन वाझेवर कितपत विश्वास ठेवायचा हा सवालच आहे. कारण यापूर्वी सचिन वाझेनं केलेली विधानं, त्याच्यावर ईडी आणि एनआयएचे दाखल असलेले यासर्वांचाही विचार होणं आवश्यक आहे. त्यामुळे खटल्याची सुरूवात झाल्यावर याप्रकरणी सचिन वाझे कोर्टापुढे काय काय खळबळजनक खुलासे करतो हे पाहणे औत्सुक्याचं आहे. दरम्यान या प्रकरणी सीबीआय गुरूवारीचं आरोपपत्र सादर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वीच माफिचा साक्षीदार घोषित करण्याची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्यार सीबीआय भर देत असल्याचं पाहायला मिळालं.


सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी सचिन वाझेने विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला. सीबीआयने त्याच्या अर्जाला सशर्त मंजुरी दिली. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दाखवली आहे. 


आधी NIA कडून अटक, मग सीबीआयकडून बेड्या 
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचारा प्रकरणात 4 एप्रिलला सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितलं होतं.